खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:53 IST2025-11-28T06:53:03+5:302025-11-28T06:53:38+5:30
शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या महिन्यात हवेचा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले

खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषणासाठी संबंधित सरकारी अधिकारी, इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेला जबाबदार धरू शकत नाहीत, कारण यापूर्वीही शहरातील हवेचा दर्जा खराबच होता, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला सुनावले.
“दोन दिवसांपूर्वी इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून निर्माण झालेल्या राखेच्या ढगांमुळे मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. “दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. परंतु, हवेचा दर्जा त्याआधीपासूनच खराब आहे”, असे मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नमूद केले. शहरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर २०२३ पासून दाखल याचिकांवर सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या महिन्यात हवेचा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
उपाययोजना काय करणार : न्यायालय
“इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकापूर्वीही मुंबईत ५०० मीटरच्या पुढील दृश्यमानता कमी होती,” असा दाखला न्यायालयाने दिला. तसेच या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणत्या प्रभावी उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असा प्रश्न दिल्लीच्या खराब हवेचा संदर्भ देत न्यायालयाने विचारला. तसेच ‘‘सर्वांत प्रभावी उपाय काय आहेत? दिल्लीत काय सुरू आहे? हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्याचा काय परिणाम होतो?’ असा प्रश्न न्यायालयाने केला.
ज्वालामुखीच्या राखेचा असा आहे संदर्भ
इथिओपियाच्या अफार प्रदेशातील ‘हेली गुब्बी’ या ‘शिल्ड’ ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. त्यातून बाहेर पडलेला राखेचा मोठा लोट आकाशात सुमारे १४ किलोमीटर (४५ हजार फूट) उंचावर गेला. हा लोट पूर्वेकडून लाल समुद्र ओलांडून अरबी द्वीपकल्प आणि भारतीय उपखंडात पसरल्याचे म्हटले जात आहे.