सॅनिटायझरने भाज्या, फळे धुताय? खबरदार; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:43 AM2020-05-28T01:43:20+5:302020-05-28T06:38:28+5:30

पाण्याचा वापर करण्याचा सल्ला

 Does the sanitizer wash vegetables and fruits? Beware; Appeal to medical experts | सॅनिटायझरने भाज्या, फळे धुताय? खबरदार; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

सॅनिटायझरने भाज्या, फळे धुताय? खबरदार; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

Next

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. विशेषत: बाहेरून ज्या वस्तू घरात आणल्या जात आहेत; त्या वस्तूंना सॅनिटायझर लावले जात आहे. विशेषत: भाज्या, फळांना सॅनिटायझर लावले जात आहे. मात्र असे करणे आरोग्यास हानिकारक असून, भाजीपाला, फळे यांना सॅनिटायझर लावू नये. तर त्या वस्तू पाण्याने स्वच्छ धुवाव्यात आणि वापराव्यात, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

नवी मुंबईतील बाजारपेठेत कोरोनाचा संसर्ग आढळला; आणि ती बाजारपेठेत बंद करण्यात आली. शिवाय मुंबईतील बाजारपेठांच्या वेळाही बदलण्यात आल्या. परिणामी भाज्यांची खरेदी करण्यासाठी सातत्याने नागरिकांकडून बाजारपेठेत गर्दी केली जात आहे. बाजारात खरेदी करण्यात आलेली भाजी घरी आणून धुतली जात असतानाच सोबत आणलेल्या वस्तूंनाही सॅनिटायझर लावले जात आहे. मात्र असे करणे हानिकारक आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील बॅरिअट्रिक सर्जन डॉ. संजय बोरूडे यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून घरात कोणतीही वस्तू आणल्यावर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शिंकल्यातून किंवा खोकल्यातून विषाणू बाहेर पडतात. हे विषाणू कपड्यावर किंवा वस्तूंवर अधिक काळ टिकून राहतात.

विशेषत: कपड्यावर कोरोनाचा विषाणू ६-८ तास जिवंत राहतो. प्लॅस्टिकच्या वस्तूंवर २४ तास तर लोखंडी किंवा पत्र्यांच्या वस्तूंवर दोन ते तीन दिवस हा विषाणू तग धरून राहतो. अशा वेळी निरोगी व्यक्ती या विषाणूच्या संपर्कात आल्यास त्यालाही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून कोणतीही वस्तू आणल्यास साबणाच्या पाण्याने धुऊन घ्यावी. तर, भाज्या फक्त स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. याशिवाय कच्च्या भाज्या खाऊ नयेत, शिजवून खाव्यात. या आजाराला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. याशिवाय वारंवार हात स्वच्छ धुवावेत व पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यास या आजाराची लागण होण्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो.

साबण, पाण्याने हात धुवा

सॅनिटायझरमुळे कर्करोग होतो का? अशीही चर्चा रंगते. याबाबत नवी दिल्ली येथील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सॅनिटायझरने कर्करोग होत नाही. जर ७० टक्के अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरले तर नुकसान होत नाही. शिवाय आतापर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. सॅनिटायझर हातावरून काही काळातच उडून जाते. तरीही एक गोष्ट वारंवार सांगितली जाते ती म्हणजे शक्य असेल त्या ठिकाणी आणि पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी जेवण करण्यापूर्वी साबण, पाण्याने हात धुवावेत.

विषाणू नष्ट होतात

कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रत्येक जण विविध पर्याय वापरत आहे. यात बाजारातून आणलेल्या भाज्या, दुधाच्या पिशव्या, खाण्याचे पदार्थ व फळे धुऊन घेतली जात आहेत. असे करणे अतिशय योग्य आहे. कारण, बाहेरून आणलेल्या वस्तू साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुऊन घेतल्यास त्यावर बसणारे विषाणू नष्ट होतात. मात्र भाज्या किंवा फळे केवळ स्वच्छ पाण्यानेच धुवावीत. याशिवाय ताप किंवा खोकला अधिक काळ असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक,

सेंट जॉर्ज रुग्णालय आरोग्यासाठी घातक

सॅनिटायझरचा वापर केवळ हात स्वच्छ धुण्यासाठीच करावा. भाज्या किंवा फळे साबणाने किंवा सॅनिटायझरने धुऊ नयेत, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. खाण्यासाठी बाहेरून आणलेल्या वस्तू जसे की, भाज्या किंवा फळे मिठाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजत ठेवावीत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांचा वापर करावा. मिठामध्ये सोडियमची मात्रा अधिक प्रमाणात असते. यामुळे हा विषाणू नष्ट करण्यास फायदेशीर ठरते.
- डॉ. गोविंद केवट, जनरल फिजिशियन

Web Title:  Does the sanitizer wash vegetables and fruits? Beware; Appeal to medical experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.