विधानसभेला ईव्हीएम नको; विरोधकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 00:32 IST2019-07-03T00:31:43+5:302019-07-03T00:32:09+5:30
ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप होत आहेत, म्हणून मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना केली .

विधानसभेला ईव्हीएम नको; विरोधकांची मागणी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हएीम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. नियम २३ अन्वये याबाबत चर्चेचा प्रस्तावही त्यांनी मांडला. मात्र, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि प्रस्तावाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रस्ताव फेटाळला. मात्र हा अशासकीय ठराव स्वीकारत असून मतदान बॅलेट पेपरद्वारे घेण्याची शिफारस केंद्र सरकारला केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेला देशातील ३७६ मतदारसंघात व्हीव्हीपॅट आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानात तफावत आढळल्याने ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर लोकांचा विश्वास उडाला आहे. ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप होत आहेत, म्हणून मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना केली . त्यावर बोलताना सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, हा विषय संवेदनशील आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यास आणि मतदान घेण्यास पुरेसा वेळ नसल्यामुळे हा प्रस्ताव आता मांडणे उचित होणार नाही. त्यामुळे मी हा अशासकीय ठराव म्हणून मान्य करीत आहे. राज्याची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्याची शिफारस शासनाला करीत आहे. यावर अशासकीय ठरावाअन्वये पुढील कार्यवाही होईल.