२० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 19, 2025 17:23 IST2025-05-19T17:22:33+5:302025-05-19T17:23:53+5:30

Ashish Shelar: मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी करताना आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

Do not do any concreting after May 20, Ashish Shelar instructs municipal officials | २० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

२० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क:मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली.या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दि,२० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, दि,३१ मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा,असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी  मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, माजी नगरसेविका हेतल गाला आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

आज रस्ते पाहणीच्या या दौऱ्यादरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. 

मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले.  दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार  मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकाऱ्यांसमोर सादर केली.

रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासाच्या कामावर आमचा सतत पाठपुरावा सुरू असून हा पावसाळ्यापूर्वी रस्ते पाहणीचा आपला तिसरा दौरा आहे.आता नवीन रस्ता खोदू नका, २० मे नंतर काँक्रीटीकरण करणे थांबा, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेली तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा,  जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करुन ते वाहतूकीस खूले होतील असे करा, डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या, तसेच सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्यात यावेत, गटारांमध्ये गेले डेब्रिज  आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी मंत्री शेलार यांनी दिल्या.

उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र
यावेळी मंत्री शेलार यांनी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन वर्षात मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल, यावरून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्त्यांची जी दयनीय स्थिती होती, त्याच्या तुलनेत फक्त एका वर्षात आम्ही ६० टक्क्यांहून अधिक रस्त्यांची सुधारणा पूर्ण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do not do any concreting after May 20, Ashish Shelar instructs municipal officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.