Maha Vikas Aghadi: आम्ही मान्य करतो! महाविकास आघाडीतील नाराजी उघड; काँग्रेसचे नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:31 IST2022-02-17T14:30:40+5:302022-02-17T14:31:31+5:30
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये नक्कीच काही प्रश्न असून, ते आम्ही आग्रहाने सोडवून घेणार आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Maha Vikas Aghadi: आम्ही मान्य करतो! महाविकास आघाडीतील नाराजी उघड; काँग्रेसचे नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात १० मार्चनंतर मोठे बदल दिसतील, असे विधान केले होते. यानंतर आता काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना यासंदर्भात सांगितले. तसेच काँग्रेस नेत्यांच्या या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. जरी एका पक्षाचे सरकार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत, असे थोरात यांनी सांगितले.
आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत
तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काही प्रश्न नक्की असून, ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का, या प्रश्नावर बोलताना, असे काही म्हणणार नाही. प्रश्न आहेत, हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून ते सोडवले जातील, असेही थारोत म्हणाले.
संजय राऊतांना पाठिंबा
तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणे महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये, यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत, याचा पुनरुच्चार बाळासाहेब थोरात यांनी केला. १० मार्चनंतर काय बदल होणार आहे याबद्दल पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील. तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतात. ते नेमके कशा पद्धतीने बोलले याची मला माहिती नाही, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.