यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची कर्मचाऱ्यांना सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:07 IST2021-01-21T04:07:55+5:302021-01-21T04:07:55+5:30

पालिका प्रशासन : तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी ५२ ...

Discount for employees to get vaccinated at any center even if their name is not in the list | यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची कर्मचाऱ्यांना सूट

यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची कर्मचाऱ्यांना सूट

पालिका प्रशासन : तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांनी केंद्रावर हजेरी लावली. कोविन ॲपमधील गोंधळ, कर्मचाऱ्यांमध्ये भीती, आदींमुळे दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम फोल ठरत आहे. यामुळे नोंदणी झाल्यानंतरही यादीत नाव नसलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईतील कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याची सूट आता महापालिकेने दिली आहे.

गेल्या शनिवार (दि. १६) पासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा ती मंगळवार (दि. १९) पासून सुरू करण्यात आली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पालिकेच्या विभागस्तरावरील वॉर रूमद्वारे फोन करून लसीकरणासाठी येण्याचा संदेश देण्यात आला. बुधवारी ३३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यापैकी १७२८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामुळे दिलेल्या विभागातच लस घेण्याची अट आता शिथिल करण्यात आली आहे.

आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. परंतु बुधवारपासून ज्यांचे नाव कोविन अ‌ॅपमध्ये आहे, अशा कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कर्मचारी जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील.

* लसीकरणात दोन टक्के वाढ

बुधवारी ३,३०० लाभार्थ्यांपैकी १,७२८ जणांचे लसीकरण झाले. यावेळी सात कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास झाला. एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नाव नोंदवले असून, आतापर्यंत सहा हजार १५१ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे.

* भीती कमी करण्यासाठी समुपदेश

लस घेतल्याने गंभीर दुष्परिणाम झाल्याचे एकही तक्रार नाही. तरीही बहुसंख्य आरोग्य कर्मचारी लस घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न पालिकेतील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.

बुधवारी झालेले लसीकरण

रुग्णालय व कर्मचारी संख्या

केईएम - ३६२, सायन - १३५, कूपर - १४९, नायर - १५४, व्ही. एन. देसाई - ५७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय - ३०६, राजावाडी - २६२, वांद्रे-कुर्ला संकुल लसीकरण केंद्र - १३३, भाभा रुग्णालय - १५५, जे. जे. रुग्णालय - १५

एकूण - १,७२८

..............

Web Title: Discount for employees to get vaccinated at any center even if their name is not in the list