सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 05:44 IST2025-02-18T05:43:36+5:302025-02-18T05:44:30+5:30
शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यात कपात केली आहे. भाजप आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय?
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यात कपात केली आहे. भाजप आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
राज्यातील व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही, त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्यात आली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका शिंदेसेनेच्या आमदारांना बसणार आहे.
एकच सुरक्षा रक्षक असेल
शिवसेना फुटल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली होती. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेसेनेच्या आमदारांबरोबर आता यापुढे एकच सुरक्षा रक्षक असेल.
वाय दर्जाची सुरक्षा गेली
शिंदेंच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. या आमदारांबरोबर पोलिसांची गाडी असायची. तसेच आमदारांच्या घराबाहेरही पोलिस तैनात असायचे. या सर्व सुरक्षेत आता कपात करण्यात आली आहे.