Join us  

विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:14 PM

मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटल्याने 25 जणांचा जीव धोक्यात आला होता.

मुंबई - शिवस्मारक बोट दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटेंना लक्ष्य केलं आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हजर नसताना कसले भूमीपूजन करत होतात ? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. तर, विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का? असा सवालही पवार यांनी विचारला आहे. 

मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटल्याने 25 जणांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, वेळीच दुसरी बोट आल्याने 24 जणांचे प्राण वाचले. पण, या बोट दुर्घटनेत चार्टर्ड अकाउंटंट सिद्धेश पवार (रा. गुणदे, जि. रत्नागिरी) या 36 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तसेच शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. तर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच अपघातातील मृत पवार यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे.

टॅग्स :अजित पवारविनायक मेटेछत्रपती शिवाजी महाराजबोट क्लबअपघात