Join us

‘बेबी केअर किट’ खरेदीत अनियमितता, खरेदी थांबविण्याची धनंजय मुंडेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 07:25 IST

धनंजय मुंडे यांचा आरोप; खरेदी थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : नवजात अर्भकांसाठी ‘बेबी केअर कीट’ खरेदी व्यवहारात गंभीर त्रुटी असून अर्भकांच्या आरोग्यासाठी हे कीट धोकादायक आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत युनीसेफचा सल्ला न घेता महिला व बालविकास विभागामार्फत ही खरेदी होत असून यात अनेक भ्रष्ट ठेकेदारांचा हात धूवून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांचा रोख मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे.

या संपूर्ण खरेदी प्रक्रियेची तातडीने चौकशी व्हावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत किटखरेदीस स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील नवजात अर्भकांना एकूण १७ वस्तुंचा समावेश असलेली ‘बेबी केअर किट’ देण्याची अंदाजे १०० ते २४० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेस विभागाने मंत्रीमंडळाची मान्यता घेतली आहे. विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील बचत गटांमार्फत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची योजना विभागाने आखली होती. या योजनेतही कुप्रसिध्द ठरलेल्या चिक्की घोटाळ्यातील एक ठेकेदार पात्र होणार असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी लक्षात आणून देऊनही सरकारने दखल न घेतल्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडली आणि पूर्वानुमानाप्रमाणे वैद्य इंडस्ट्रीज या चिक्की घोटाळ्यातील ठेकेदाराची निवड झाली. अनेक जिल्ह्यात या ठेकेदारांनी पुरविलेल्या निकृष्ट नॅपकिनची विक्री न झाल्यामुळे बचत गटांचे खेळते भांडवल आडकून पडले असून बचत गट प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्याच्या तक्रारी आहेत.मात्र या ठेकेदारांवर वा यंत्रणेतील संबंधितांवर कारवाई करण्याची हिम्मत सरकारमध्ये नाही, असा आरोप मुंडे यांनी केला आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीस