देवेंद्र फडणवीस आपण ट्विट डिलीट करायला लावा, जितेंद्र आव्हाडांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:54 IST2021-04-22T21:48:27+5:302021-04-22T21:54:36+5:30
आशिष येचुरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

देवेंद्र फडणवीस आपण ट्विट डिलीट करायला लावा, जितेंद्र आव्हाडांचा संताप
मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले, ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. आशिष येचुरी यांच्या निधनाची माहिती स्वत: सीताराम येचुरी यांनीच दिली आहे. (CPI-M leader Sitaram Yechury's son dies of Covid-19 in Gurgaon). मात्र, एका भाजपा नेत्याने या दु:खद घटनेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलंय. त्यावरुन, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय.
आशिष येचुरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष येचुरी हे पत्रकार होते. दिल्लीतील एका वृत्तपत्रात सिनिअर कॉपी एटिडर म्हणून ते काम करत होते. आशिष यांच्या निधनानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी सिताराम येचुरी यांचे सांत्वन केले आहे. अनेकांनी आशिष येचूरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. मात्र, एका भाजपा नेत्याच्या ट्विटमुळे जितेंद्र आव्हाड हे चांगलेच संतापले आहेत.
भाजपाचे बिहारमधील उप प्रदेशाध्यक्ष मिथलेशकुमार तिवारी यांनी आशिष येचुरी यांच्या निधनाबद्दल ट्विट केलं होतं. चीनचे समर्थक सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी यांचे चायनीज कोरोनामुळे निधन असे ट्विट मिथिलेश कुमार यांनी दुपारी 1.18 वाजता केले होते. या ट्विटचा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना ट्विटमध्ये मेन्शन करुन हे ट्विट डिलीट करायला सांगा, असे आवाहनही केलंय.
हे संस्कार ... एका ज्येष्ठ नेत्यानी आपला 35 वारशाचा मुलगा गमावला ...आणि हे बघा काय लिहितात ....@Dev_Fadnavis आपण ट्विट डिलीट करायला lava pic.twitter.com/kiDfP1SnVn
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 22, 2021
विशेष म्हणजे मथिलेश कुमार तिवारी यांनी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करण्यापूर्वीच आपलं ट्विट डिलीट केलं आहे. तसेच, माझे अकाऊंट हॅक झाले होते, त्यातूनच हे असंवेदशील ट्विट करण्यात आले. ही बाब लक्षात येताच ते ट्विट डिलीट करण्यात आलंय. कुठल्याही निधनावर राजकारण हे निंदात्मक आहे. मी सिताराम येचुरी यांच्या दु:खात सहभागी असून सांत्वन करतो, असे स्पष्टीकरणाचे ट्विटही मिथिलेश कुमार यांनी केलंय.