"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:09 IST2025-12-24T15:07:33+5:302025-12-24T15:09:45+5:30
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: "पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये", असेही ते म्हणाले

"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या गोष्टीवर आज शिक्कामोर्तब झाले. मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची युती झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. इतर ठिकाणी काय होणार, याची लवकरच माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक मत मांडले.
"मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे लोक हिंदुत्ववादाशी फारकत घेतात, मतांसाठी लांगुलचालन करतात त्यांची काय अवस्था होते, हे सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही, तर तो भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. भारतीय जीवनपद्धतीला स्वीकारणारा आमचा हिंदुत्ववाद आहे. प्रभू श्रीरामांना मानणारा प्रत्येक जण हिंदुत्ववादी आहे. मग त्याची जात धर्म आम्ही पाहत नाही. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना सुनावले.
"ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे पण त्यामुळे फार काही राजकीयदृष्ट्या घडणार नाही. पक्षाला निवडणुकीतील आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण मुंबईकरांचा सातत्याने या मंडळींनी विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम यांनी केले. मराठी माणूस यांच्यासोबत नाही. अमराठी माणसांवर हल्ले केल्याने तेही यांच्यासोबत नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यांनी अजून दोन चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर हे महायुतीचे काम पाहून, भविष्यातील काम बघून महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील", असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.