“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:07 IST2025-10-23T06:02:52+5:302025-10-23T06:07:26+5:30
सत्तेत असलेल्या भाजप महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. नवे भागीदार येणार नाहीत, विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री पदावर २०२९ पर्यंत मी कायम राहणार असून, सत्ताधारी आघाडीत कोणताही बदल होणार नाही. माझे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतेच आहे, दिल्ली अजून दूर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांनी सांगितले की, सत्तेत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. नवे भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून मतदार यादीतील विसंगतींवर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विरोधकांनी निवडणूक यादींबाबत कोणतेही ठोस आक्षेप अथवा सूचना दिलेल्या नाहीत. त्यांचा उद्देश केवळ निवडणुका उशिरा व्हाव्यात हा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याने या पार्श्वभूमीवर हा मुद्दा गाजत आहे.
राजकीय प्रतिस्पर्ध्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. २०२४ च्या निवडणुकांनंतर राज्यात राजकीय स्थैर्य येईल आणि नेतृत्वात सौहार्द वाढेल, असा मला विश्वास होता. २०१९ नंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे नेत्यांमध्ये तणाव होता; परंतु आज मी ९९ टक्के नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतो, असे फडणवीस म्हणाले.
दोन भावांची जवळीक, माझ्यासाठी कौतुकाचा विषय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी 'मी मराठी विषयावर दोन भावांना जवळ आणले असे विधान केले आहे. हे मी त्यांच्या कौतुकाच्या रूपाने घेतो.
ते पुढे म्हणाले, पूर्वी माझ्यावर पक्ष फोडल्याचा आरोप झाला होता. मात्र, कोणताही तिसरा व्यक्ती पक्ष फोडू शकत नाही; फक्त महत्त्वाकांक्षा आणि अन्याय यामुळेच पक्ष्क्ष तुटतात. मला आशा आहे की मतदानानंतर ठाकरे बंधू एकत्र राहतील, असे ते म्हणाले.
'ठाकरे ब्रँड' म्हणजे केवळ शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहे, दुसरा कोणीही होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांबाबत विचारले असता ते म्हणाले, जसे माझे राज ठाकरेंशी संबंध आहेत तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी आहेत.
मंत्र्यांच्या कामगिरीचे होणार मूल्यांकन
राज्यातील मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'कोणताही मंत्री कमी कार्यक्षम नाही. आम्ही लवकरच सरकारचे एक वर्ष पूर्ण करू आणि त्यावेळी कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी योग्य समन्वय साधणार!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आघाडी योग्य राजकीय समन्वय साधेल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात निवडणुकीपूर्वी आघाडी ठरेल, तर इतर भागात निवडणुकीनंतर समन्वय साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये एनडीएसाठी अनुकूल स्थिती
बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्याची परिस्थिती 'एनडीए'साठी अनुकूल आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनतेत कोणतीही नाराजी नाही.