'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:48 IST2023-12-08T08:47:16+5:302023-12-08T08:48:23+5:30

माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे.

Devendra Fadnavis' letter from Nawab Malik to Ajit Pawar criticized by Sushma Andhare | 'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

मुंबई: देशद्रोहाच्या आरोपानंतर तब्बल पाच अधिवेशनानंतर परतलेले माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. 

देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, असं देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्राद्वारे म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रावर विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. सत्तेपेक्षा देश मोठा जर वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना तुमचा विवेकवाद कुठं गेला होता?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं पत्रात काय म्हटलंय?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

Web Title: Devendra Fadnavis' letter from Nawab Malik to Ajit Pawar criticized by Sushma Andhare