Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो उद्धाटनाचं देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण नाही; मेट्रोचं श्रेय भाजपाचं, खासदाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:18 IST

देवेंद्र फडणवीस यांच एक ट्विट होतय व्हायरल होत आहे. २०१८ ला देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम आधीच पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकार मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या पहिल्या टप्प्याचे गुढी पाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन करणार आहे. परंतु त्याचे श्रेय भाजपाचे आहे असा टोला भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लगावला आहे. मुंबई मेट्रो उद्धाटनावरून शिवसेना-भाजपा यांच्यात राजकारण तापलं आहे. मेट्रो कामाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याचं चर्चेला उधाण आलं आहे.

खा. गोपाळ शेट्टी म्हणाले की, "नगर विकास मंत्री या नात्याने  व्येंकैया नायडू यांनी मेट्रो प्रकल्पांना गती देऊन मेट्रो बोरिवलीपासून दहिसर पर्यंत केली.  त्यापुढे भाईंदर आणि नंतर ठाणे जिल्हा पर्यंत आणि त्यापुढे पूर्ण रिंग रुट करून घेतली. यासाठी त्यांनी अनेकदा मुंबईच्या दौरा केला. देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक रित्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी व्यवस्था करून कामाला गती दिली आणि त्याप्रमाणे २०१९-२० मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायची शक्यता होती. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तीन पक्षांच्या सरकारने मेट्रो कारशेडचा विषय त्यांच्या इगोमुळे रखडवला. त्यामुळे यात भरपूर वेळ गेल्याने मुंबईकरांना वेळेवर मेट्रो रेल्वे सेवा उपलब्ध झाला नाही.आणि मेट्रो प्रकल्प महाग झाला. त्यामुळे  मेट्रो प्रवास देखील महाग होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाआघाडी सरकारने आपला अहंकार बाजूला ठेऊन मेट्रो कारशेडला गती देऊन सदर काम वेळेत पूर्ण करावे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

यातच देवेंद्र फडणवीस यांच एक ट्विट होतय व्हायरल होत आहे. २०१८ ला देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम आधीच पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. तसेच याकामात केंद्राकडून फडणवीस यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. भाजपाने शनिवारी होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच शहरभर बॅनर्स झळकावले आहेत. “काम केलय, मुंबईन पाहिलय, धन्यवाद देवेंद्रजी..अशा आशयाचे होर्ग्डिंस वांद्रे आणि आसपासच्या परिसरात झळकावण्यात आले आहे.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं उद्धाटन होणार आहे तर दुसरीकडे मेट्रो उद्धाटनावरून भाजपाने मेट्रो प्रकल्पासाठी त्यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या निधीचा बॅनर्स लावले आहेत. मुंबईतील ३३७ किमी मेट्रो प्रकल्पासाठी १ लाख ४० हजार ४३३ कोटी मंजूर करण्यात आले होते. भाजपा सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो कामाला सुरूवात झाली. त्यामुळे उद्धाटन महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असले तरी त्याचे श्रेय भाजपाचेच आहे असा दावा या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवासस्थान परिसरात हे बॅनर्स लावण्यात आल्याने त्याची विशेष चर्चा होत आहे. मुंबईकरांना मेट्रो ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच मिळाली असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो उद्धाटनाआधीच मुंबईत शिवसेना-भाजपा यांच्यात राजकारण तापल्याची चिन्हे दिसून येत आहेत.  

टॅग्स :मेट्रोदेवेंद्र फडणवीसभाजपाउद्धव ठाकरे