"शरद पवारांना आव्हान देतो..."; अजित पवारांसमोरच देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:13 IST2024-10-16T13:11:09+5:302024-10-16T13:13:20+5:30
शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्यव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"शरद पवारांना आव्हान देतो..."; अजित पवारांसमोरच देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान
Devendra Fadanvis On Sharad Pawar : महायुतीची बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारचे गेल्या दोन वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर केले. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदेंना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं शरद पवार यांनी म्हटल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. विरोधकांनी आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुनही जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महायुतीने आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा मग आम्ही करु असे म्हटलं होतं. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांना थेट आव्हान दिलं. महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस शरद पवारांना प्रत्युत्तर देत असताना अजित पवार बाजूलाच बसले होते.
"शरद पवार यांना माहिती आहे की त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचे कुणाला डोहाळे लागलेले नाहीत. आमचं सव्वा दोन वर्षाचे काम हाच आमचा चेहरा आहे. त्यांनी आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"सत्तापक्षाला मुख्यमंत्री पदाची चिंता नाही. कारण इथे स्वतः मुख्यमंत्री बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा. एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा. मी शरद पवारांना आव्हान करतो की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एवढं सांगा," असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.