मुंबईत १७ हजारांवर कोरोना मृत्यू दडविले, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 10:43 IST2021-07-07T10:41:25+5:302021-07-07T10:43:28+5:30
भाजपाच्या वतीने विधानभवन परिसरात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या अभिरूप विधानसभेचे कामकाज जवळजवळ पाच तास चालले.

मुंबईत १७ हजारांवर कोरोना मृत्यू दडविले, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी राज्य सरकारने पुकारली आहे. सभागृहात विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. कट रचून आमच्या आमदारांना निलंबित केले जाते आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. मुंबईत दडविण्यात आलेले १७ हजारावर कोरोना मृत्यू, राज्यातील एकूणच कोविडची स्थिती, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, धान घोटाळा, गुन्हेगारीतील वाढ अशा विविध विषयांवर त्यांनी अभिरूप विधानसभेत राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
भाजपाच्या वतीने विधानभवन परिसरात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या अभिरूप विधानसभेचे कामकाज जवळजवळ पाच तास चालले. यात राज्य सरकारविरूद्ध निंदाव्यंजक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रारंभी पायऱ्यांवर सुरू झालेली ही अभिरूप विधानसभा अवघ्या तासाभरातच बंद करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा ही अभिरूप विधानसभा भरविण्यात आली. अनेक सदस्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्र देशातील कोरोनाची राजधानी बनली आहे. सर्वाधिक २० टक्के रूग्णसंख्या, २३ टक्के सक्रिय रूग्ण आणि ३० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकीकडे केंद्राकडून लसी मिळाल्या नाहीत, अशी ओरड केली जाते.