'Devendra fadanvisji did as much as he wanted to do, it is wrong to target him on the basis of caste', udayanraje bhosale | 'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं'

'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं'

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीचं लेबल लावून होणाऱ्या आरोप चुकीचा असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. त्या बिचाऱ्याचा काय संबंध, त्यांचं नाव राजे भोसले असतं, राजेशिर्के किंवा राजे महाडिक असतं तर..

मुंबई – मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात मराठा आरक्षण चिघळत असताना पोलीस भरती करणं योग्य नाही,आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी काही जण मी ब्राह्मण असल्याने माझ्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत असा आरोप केला होता. यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांना विचारलं असता, देवेंद्रजींनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असे सांगत राजकारण केलं जात असल्याचं म्हटलंय. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीचं लेबल लावून होणारा आरोप चुकीचा असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. त्या बिचाऱ्याचा काय संबंध, त्यांचं नाव राजे भोसले असतं, राजे शिर्के किंवा राजे महाडिक असतं तर...., यात जातीचा प्रश्नच येत नाही. त्यांनी जेवढं करायचं तेवढं देवेंद्रजींनी केलं आणि प्रामाणिकपणे केलं. बाकीच्यांना जर राजकारण आणायचं असेल, तर लोकं त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत, असे म्हणत उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीय रंग देणाऱ्यांना चपराक लगावली. तसेच, मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तेवढं केल्याचंही उदयनराजेंनी सांगितलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीली मुलाखत देताना, चुकीच्या बातम्या पसरवून, मी ब्राह्मण असल्यानं माझ्या माथी सर्वकाही चालतं, असे म्हणत होत असलेल्या राजकारणाबद्दल खंत व्यक्त केली होती. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

माझी जात ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षणाचा विषय माझ्यावर टाकला की संशय निर्माण करता येतो असे काही जणांना वाटते, तथापि, मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे. माझ्याबाबत असा संशय निर्माण करणाऱ्यांना कधीही यश येणार नाही, आरक्षणाच्या प्रकरणात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडू नये, असे मी सांगितल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. स्वत: कुंभकोणी यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता तर महाविकास आघाडीचे सरकार आहे तरीही कुंभकोणी नव्हे तर माजी महाधिवक्ता थोरात यांच्या नेतृत्वातील टीम बाजू मांडत आहे, मी कुंभकोणी यांना तसे सांगण्याचा प्रश्न येतो कुठे? थोरात यांच्या टीमनेच उच्च न्यायालयात केस जिंकलेली होती, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.

शिवसेनेनं ब्राह्मण मुख्यमंत्री केला

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेनेने भाष्य केले आहे. महाराष्ट्र कधीही जातपात धर्म पाहत नाही, महाराष्ट्राने मुस्लीम मुख्यमंत्री दिलेला आहे, अल्पसंख्याक मंत्री दिले आहेत. पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता. त्यामुळे असा आरोप करणं चुकीचा आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारलं आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Devendra fadanvisji did as much as he wanted to do, it is wrong to target him on the basis of caste', udayanraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.