Join us
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: राज्य सरकारने एवढे कोटी कमावलेत, इंधन दरकपातीच्या वादात फडणवीसांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:48 IST

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. मात्र, महाराष्ट्रासारख्या, देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आता, या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, राज्य सरकारने सर्वसामान्य मराठी माणसाला दिलासा द्यावा, असेही त्यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी, असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही, आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमवेतच्या बैठकीनंतर दिली. आता, केंद्र विरुद्ध राज्य सरकारच्या या वादात विरोधी पक्षनेत्यांनीही उडी घेतली आहे. 

''दोषारोपाचा खेळ हा बचाव करण्यासाठी आणि गैरकृत्ये लपवण्यासाठी चांगला आहे. पण, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भारत सरकारने इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हा राज्यांना कर कमी करण्याची विनंतीही केली होती. परंतु, महाराष्ट्रासह बिगर-भाजप शासित राज्ये जनतेला त्रास देत केवळ नफा कमाविण्यात व्यस्त आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राने आधीच 3400 कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, त्यांनी त्वरित कार्यवाही करुन मराठी माणसाला दिलासा द्यावा,'' अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विटरद्वारे केली आहे. 

मुंबईत किती कर केंद्राला आणि राज्यात

मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे, हि वस्तुस्थिती नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीपेट्रोल