Deven Bharti as ATS chief 18 IPS officers promotions and 10 transferred | एटीएसच्या प्रमुखपदी देवेन भारती; १८ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती तर १० जणांची बदली

एटीएसच्या प्रमुखपदी देवेन भारती; १८ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती तर १० जणांची बदली

मुंबई : निवडणुकीच्या नियमांमुळे आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आलेले देवेन भारती यांना पदोन्नती देत, त्यांच्या खांद्यावर राज्य दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह एकूण १८ जणांना पदोन्नती तर १० जणांच्या बदलीचे आदेश बुधवारी गृह विभागाकडून काढण्यात आले.

एकाच पदावर जास्तीतजास्त कार्यकाळ राहिल्यामुळे निवडणूक आयोगाने मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त भारती यांची बदली करण्यास गृह मंत्रालयाला सांगितले होते. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळल्याने त्यांना या नियमातून वगळण्यात यावे, असा प्रस्ताव गृह विभागाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. अखेर, त्यांना पदोन्नती देत त्यांची एटीएसप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची मुंबईत प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत महाराष्ट्र राज्य सुधार सेवेचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांची सह पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुखपद मिळावे म्हणून अनेक अधिकारी प्रयत्न करीत असतात. त्यात सध्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष डुंबरे यांना पदोन्नती देत, एसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नुकतेच मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेले सहपोलीस आयुक्त (प्रशासन) संतोष रस्तोगी यांची वर्णी लागली आहे.
वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार हे केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर बदली मिळावी म्हणून प्रयत्नात होते. मात्र, त्यांची मुंबईच्या गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली आहे. फोर्स वनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुखविंदर सिंह यांना पदोन्नती देत, फोर्सवनच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशासन विभागाचे अनुपकुमार सिंह यांना पदोन्नती देत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विनीत अग्रवाल हे राज्य सुरक्षा महामंडळाचे अप्पर पोलीस महासंचालक बनले आहेत. पुण्याच्या सुधार सेवेच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रशासन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची गृहनिर्माण व कल्याण महामंडळात बदली करण्यात आली आहे.

प्रताप दिघावकर यांना राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. मनोज लोहीया (पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य रस्ते परिवहन महामंडळ) यांची तेथेच विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय यादव (पोलीस उपमहानिरीक्षक गुन्हे अन्वेषण, पुणे) यांना त्याच ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. ठाणे शहर प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त केशव पाटील यांची मुंबईच्या प्रशिक्षण संचालनालयाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पी.व्ही. देशपांडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे) यांच्यावर पुण्याच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी संचालकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन विभागात कृष्णप्रकाश यांची, तर दीपक पांडे (विशेष पोलीस महानिरीक्षक गृह निर्माण व कल्याण मंडळ) यांची सुधार सेवा विभागात बदली करण्यात आली.

नागपूर शहराचे (गुन्हे) पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना तेथेच अप्पर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. एम. आर. घुर्ये (साहाय्यक पोलीस महानिरीक्षक) यांना राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली.
संजय शिंदे यांना अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन, पुणे येथे नियुक्ती देण्यात आली, पुण्याच्या गुन्हे अन्वेषण पोलीस अधीक्षक आर. बी. डहाळे यांना पुण्यातील बिनतारी संदेश यंत्रणा येथे पोलीस उप महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

पुणे शहर, गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून राज्य राखीव बल, पुणे पोलीस अधीक्षक ए.आर. मोराळे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. निसार तांबोळी (उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग) यांची पदोन्नतीने नवी मुंबई पोलीस उपमहानिरीक्षक मुख्य दक्षता अधिकारी, सिडको येथे नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक पोलीस अकादमीचे जालिंदर सुपेकर यांना आर्थिक गुन्हे शाखा, पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे, तर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जय वसंतराव जाधव यांची राज्य सुरक्षा महामंडळात बदली केली आहे. राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक एम.के. भोसले यांची औरंगाबाद सुधारसेवा मध्य विभागात बदली करण्यात आली आहे.

Web Title: Deven Bharti as ATS chief 18 IPS officers promotions and 10 transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.