भोईवाड्यातील डम्पिंग ग्राउंडवर फुलली ‘देवराई’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:51 AM2019-10-21T01:51:01+5:302019-10-21T06:01:21+5:30

पवित्र वृक्षांच्या उपासनेसारखीच ‘देवराई’विषयीची श्रद्धा भारतीय परंपरेने जपलेली दिसते. देवराया ही पवित्र वृक्षांची निवासस्थानेच असतात.

'Devarai' blossoms on dumping ground in Bhoiwada | भोईवाड्यातील डम्पिंग ग्राउंडवर फुलली ‘देवराई’

भोईवाड्यातील डम्पिंग ग्राउंडवर फुलली ‘देवराई’

Next

मुंबई : पवित्र वृक्षांच्या उपासनेसारखीच ‘देवराई’विषयीची श्रद्धा भारतीय परंपरेने जपलेली दिसते. देवराया ही पवित्र वृक्षांची निवासस्थानेच असतात. भोईवाडा येथील पोलीस कॅम्पमध्ये ब्रीथिंगरूट्स संस्थेच्या पर्यावरणप्रेमींनी देवराई निर्माण केली आहे. विविध प्रजातींची १०० हून अधिक झाडे लावून डम्पिंग ग्राउंडवर देवराई फुलविण्यात आली आहे. झाडांच्या वाढत्या संख्येमुळे पक्षी, कीटकांचा अधिवास वाढत आहे.

निसर्ग अभ्यासक परेश चुरी म्हणाले, पूर्वी देवराईची जागा डम्पिंग ग्राउंड होती. आजूबाजूला झोपडपट्टी वस्ती असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. सुरुवातीला जागा स्वच्छ करून तिथे विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत आपटा, अर्जुन, आवळा, सफेद बहावा, पिवळा बहावा, पंगारा, शेंदुरी इत्यादी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.

सध्या वृक्षारोपणाचे काम पूर्ण झाले असून आता झाडांच्या जोपासनेचे काम सुरू आहे. देवरायांमध्ये सापडणाऱ्या काही प्रजाती त्या वनाचे जैववैविध्य राखण्याचे काम करतात. झरे, तळी, सरोवरे, विहिरी या पाण्याच्या स्रोतामुळे आसपासच्या वसाहतींना उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा पुरवठा करतात. शिवाय देवरायांमधील बाष्पीभवनामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते आणि परिसरातील तापमान कमी होते.

दुर्मीळ प्रजातीचे संवर्धन आणि वाढ

अतिशय दुर्मीळ धोक्यात आलेल्या आणि धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींसाठी देवराया हे महत्त्वपूर्ण आश्रयस्थान आहे.

दालचिनीची एक दुर्मीळ प्रजात ‘सीनामोमूम क्वॉलोनेसीस’ केरळातील अलापुझा जिल्ह्यातील केवळ काही देवरायांमध्येच आढळते.
मध्य प्रदेशातील अमर कंटक देवराईत अगदी अलीकडेच बेडकाची एक नवी प्रजात आढळली.

एरवी धोक्यात आलेल्या किंवा दुर्मीळ होत चाललेल्या अनेक प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजातीही अनेक ठिकाणच्या देवरायांमध्ये सुरक्षित आहेत.

Web Title: 'Devarai' blossoms on dumping ground in Bhoiwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा