मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:27 IST2025-08-22T11:23:39+5:302025-08-22T11:27:26+5:30

Deputy CM Eknath Shinde News: युतीच्या घोषणेला साधारण महिना उलटून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली.

deputy cm eknath shinde started preparing for upcoming mumbai municipal corporation elections meeting with anandraj ambedkar know what was decided | मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

Deputy CM Eknath Shinde News: आगामी मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई मनपा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानल्या गेलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि महायुती यांच्या पॅनलने बाजी मारत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव केला. यानंतर आता महायुतीतील नेत्यांना आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची एक बैठक झाली. मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली गेली आहे. 

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साथ देत असल्याची घोषणा केली. आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तिक युतीची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे वेगळे नेते असून, ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत, असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले होते. या युतीच्या घोषणेला साधारण महिना उलटून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली.

एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक, काय ठरले?

या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली. साधारण महिन्याभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीची घोषणा आम्ही केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच आनंदराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक पार पडली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा स्तरावर समन्वय साधणे, त्यासाठी योग्य धोरण तयार करणे, कार्यकर्त्यांमध्ये याबाबत योग्य तो संदेश पोहोचवण्याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत सुचवण्यात आलेल्या पर्यायानुसार त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी रिपब्लिकन सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. शिवशक्ती-भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. आपला वैयक्तिक अजेंडा नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्ता नेत्याला मोठा करतो. कार्यकर्ता पक्षाला निवडणूक जिंकून देतो. अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यामागे नेत्याने खंबीरपणे उभा राहिले पाहिजे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर आणि आमची जोडी एकदम सुपरहीट आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. 

Web Title: deputy cm eknath shinde started preparing for upcoming mumbai municipal corporation elections meeting with anandraj ambedkar know what was decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.