Join us

एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 08:31 IST

Shiv Sena Shinde Group News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धवसेनेतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Shiv Sena Shinde Group News: महाराष्ट्रातील 'मिनी विधानसभा' अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतिक्षित निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे महत्त्वाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. तसेच, चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना काढावी, असे बजावले. त्याचवेळी काही अडचण उद्भवल्यास आयोग वेळ वाढवून घेण्यासाठी न्यायालयाला विनंती करू शकतो, असेही निर्देश दिले. विशेष म्हणजे, २०२२ पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका घ्याव्या, असे आदेश देत सध्या सुरू असलेल्या याचिकांवर जो काही निकाल येईल, तो निर्वाचित सर्व सदस्यांना लागू राहील, असेही न्यायालय म्हणाले. यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबाबत माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना जोरदार धक्का दिला. पिंपरी चिंचवड, मावळ, मुंबईतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडच्या तीन व लोणावळा नगर परिषदेच्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या झालेल्या पक्षप्रवेशामध्ये बाळासाहेब ओव्हाळ, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, अनंता आंद्रे, दत्तात्रय झाडे, भाऊसाहेब सकाटे, मदन शेडगे, सोमनाथ कोंडे, प्रकाश पाठारे आणि मावळ मतदार संघातल्या राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा पक्षाच्या संघटक, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, तालुका संघटक, युवक काँग्रेस अध्यक्ष यांचा समावेश होता. शिवसेना उपनेते संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील स्थानीय लोकाधिकार समितीचे विजय परब यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते संजय निरुपम तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर एअर स्ट्राईक करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानातील निरपराध नागरिकांची काळजी घेतली. यापुढे पाकड्यांना असेच चोख उत्तर मिळेल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानला जशास तसा धडा शिकवला आहे. मात्र 'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असा विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसराजकारण