ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:04 IST2025-02-07T20:00:55+5:302025-02-07T20:04:58+5:30

Deputy CM Eknath Shinde News: गेल्या २ वर्षांपासून पक्षप्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. शिवसेनेवरील विश्वास वाढत चालला आहे. या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

deputy cm eknath shinde said that many thackeray group workers joined the party from mumbai thane kalyan and slams uddhav thackeray | ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात”

ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात”

Deputy CM Eknath Shinde News: मुंबईसह कल्याण, भिवंडी, ठाणे येथील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांच मनापासून आभार मानतो. गेल्या २ वर्षांपासून शिवसेनेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. लोकांचा शिवसेनेवरील विश्वास वाढत चालला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला गेला होता. याबाबत हा दावा खोटा असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवली. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वज्रमूठ एकजुटीची हवाच काढली आणि सगळेच माझ्या संपर्कात असल्याचा दावा केला.

ठाकरे गटाला खिंडार सुरूच, अनेकांनी केला शिंदे गटात प्रवेश 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाच्या मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडीसह राज्यातील अनेक तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखवून दिली, याबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, माझ्या संपर्कात सगळेच आहेत. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही माझ्याकडे सगळ्या पक्षांचे लोक येत होते. आता मी उपमुख्यमंत्री आहे. माझ्याकडे नगरविकास खाते आहे, माझ्याकडे गृहनिर्माण आहे, माझ्याकडे एमएसआरडीसी आहे, त्यामुळे लोक माझ्याकडे येत असतात. लोक संपर्कात असतात. शेवटी लोकांना विकास व्हायला हवा आहे. कोण काय म्हणत आहे, त्याकडे मी जात नाही. मी कामाला आणि विकासाला महत्त्व देणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, माझ्याकडे जे लोक कामासाठी येतात, त्याचा पक्ष मी पाहत नाही. त्यांचे काम करतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच गेल्या अडीच वर्षांत आम्ही जी कामे केली, त्याची पोचपावती विधानसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला दिली. जे घरी बसतात, त्यांना घरी बसवले. लोकांना काम करणारे हवे आहेत, नुसते आरोप करणारे आणि शिव्या शाप देणारे लोक आता नको आहेत, यावरच या विधानसभा निकालांतून शिक्कामोर्तब झाले आहे. काही लोक म्हणत होते की, हरतात तेव्हा कोर्टाला शिव्या देतात, आरोप करतात, निवडणूक आयोगावर टीका करतात. ईव्हीएम मशीनवर शंका घेतात. जनतेच्या न्यायालयात जाऊन आता न्याय मिळवून घेऊ, असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी लगावला. 
 

Web Title: deputy cm eknath shinde said that many thackeray group workers joined the party from mumbai thane kalyan and slams uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.