“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:27 IST2025-07-01T17:27:12+5:302025-07-01T17:27:40+5:30
Deputy CM Eknath Shinde News: नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
Deputy CM Eknath Shinde News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानांवरून विरोधक आक्रमक झाले. विधानसभेत बोलताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
या प्रकारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला. नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांना विधानसभेचे नियम, कामकाज माहिती आहे. विधानसभा सभागृहाची गरिमा आणि पावित्र्य राखले पाहिजे, हेही त्यांना माहिती आहे. ते का एवढे आगतिक झाले, ते माहिती नाही. अध्यक्षांच्या आसनाकडे गेले आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. बरेच दिवस काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा झाली नाही, दिल्लीतही त्यांची चर्चा नव्हती. म्हणून नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा चर्चेत येण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे का, परंतु, त्यासाठीही पंतप्रधान मोदी यांचेच नाव घ्यावे लागत आहे. कारण बाप, बाप होता हैं, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे
एकच सांगेन की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला मोठी मदत केली आहे. रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला निधी दिला. डबल इंजिन सरकारमुळे विकास होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. सन्मान केला पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात. नाना पटोले यांनीही पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.