विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:00 IST2025-07-02T13:58:17+5:302025-07-02T14:00:57+5:30
Deputy CM Ajit Pawar News: कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही. समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
Deputy CM Ajit Pawar News:शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले की, विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्यांच्या नावावर राजकारण करायचे आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले.