एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:11 IST2026-01-08T16:09:42+5:302026-01-08T16:11:00+5:30
शरद पवारांना ११ जागा दिल्या, त्यांनी शिवसेनेसाठी कुठे रक्त सांडले? मला एक जागा देऊ शकत नव्हते का? अशी खंत माजी आमदाराने व्यक्त केली.

एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मुंबईत महायुतीच्या माध्यमातून शिंदेसेना ९० जागा लढत आहे. त्यात मराठी बहुल भागात ठाकरेंचे बालेकिल्ले फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न सुरू केलेत. मुंबईतील वरळी, लालबाग-शिवडी या भागात एकनाथ शिंदे यांनी रोड शो आयोजित करत इथल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचं काम केले. मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी असा डाव साधला. ज्याची चर्चा सध्या लालबाग परळ भागात होत आहे.
लालबाग शिवडी मतदारसंघाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांची शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीमुळे दगडू सपकाळ नाराज असल्याची बातमी सर्वत्र पसरली. दगडू सपकाळ यांची मुलगी रेश्मा सपकाळ महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक होती. मात्र पक्षाकडून तिला तिकीट न भेटल्याने दगडू सपकाळ नाराज आहेत. त्यात एकनाथ शिंदे लालबाग भागात आले असताना त्यांनी दगडू सपकाळ यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. या भेटीबाबत दगडू सपकाळ म्हणाले की, आपल्याकडे कुणी पाहुणा आला तर त्याला हाकलून लावणार का, शिंदेंना कुणीतरी सांगितले, माझी तब्येत बरोबर नाही. मी ८ वाजताच झोपतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फोन केला आणि तू घरात आहेस का, मी येतो असं बोलले. मग त्यांना नको बोलायचे का? ते आले, बसले, तब्येतीची विचारपूस केली एवढच झालं.. असं सपकाळ यांनी सांगितले.
तसेच मी माझ्या मुलीला तिकीट मागितले, १५ वर्ष मी पक्षाकडे काही मागितले नाही. मी घरी बसलो नाही तर शिवसेनेच्या कामातच आहे. मुलीची इच्छा होती तिला नगरसेवक व्हायचे होते म्हणून १ जागा मागितली. परंतु ती मिळाली नाही. शरद पवारांना ११ जागा दिल्या, त्यांनी शिवसेनेसाठी कुठे रक्त सांडले? मला एक जागा देऊ शकत नव्हते का? बाकी नाही. मी त्यांना काही बोललो नाही आणि बोलणारही नाही. आपलं आयुष्य ठाकरेंनी उभे केले आहे. ठाकरेंनी आमच्यासाठी खूप केले नाहीतर कोण दगडू सपकाळ, शिवसेना या ४ अक्षरांनी मला राज्यभरात पोहचवले. शिवसेनेने मला मोठे केले. मातोश्रीला आजही दैवत मानतो. मी चुकूनही मातोश्री आणि साहेबांविरोधात बोलणार नाही. मी घरातच बसायचे ठरवलं आहे. या वयात अपमान सहन करणार नाही. एक फोन केला असता, दादा अशी अडचण असल्याने रेश्माला तिकीट देऊ शकत नाही एवढे सांगितले असते तरी मी खुश झालो असतो. माझी गरज संपली आहे अशी खंत माजी आमदार दगडू सपकाळ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दगडू सपकाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते, पदाधिकारी आणि आमदार होते. त्यांच्या मुलीला तिकीट मिळाले नाही तसं अनेक ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांच्या जवळच्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी मिळाली नसेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात. ठीक आहे ते नाराज असू शकतात. आम्ही त्यांच्या घरी जाऊ. मधल्या काळात ते साताऱ्याला त्यांच्या गावी गेले होते. आमची सद्भावना त्यांच्यासोबत आहेत. दगडूदादा हे आमचेच आहेत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.