फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:34 IST2025-08-14T07:33:50+5:302025-08-14T07:34:40+5:30

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ

Deputy Chief Minister Eknath Shinde and MLA Aditya Thackeray are likely to appear on the same stage on Thursday | फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात

फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे वरळी मतदारसंघातील आ. आदित्य ठाकरे गुरुवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन इमारतींमधील सदनिकांचे चावीवाटप करण्यात येणार आहे. शासकीय कार्यक्रमांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत स्थानिक आमदार आणि खासदारही उपस्थित राहण्याचे संकेत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे, या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी पालकमंत्री, ज्या मतदारसंघात कार्यक्रम आहे त्या मतदारसंघाचे स्थानिक आमदार बसतात. गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणार का यावरूनही चर्चा सुरू आहे.

यशवंत नाट्य मंदिरात १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उभारलेल्या इमारत क्रमांक १ मधील डी आणि ई विंगमधील ५५६ घरे गुरुवारी वितरित करण्यात येणार असून, छोट्या घरातून मोठ्या घरात जाण्याचे बीडीडीवासीयांचे स्वप्न साकार होणार आहे. तर येत्या डिसेंबरपर्यंत नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील ३ हजार ९८९ घरे पूर्ण होणार आहेत.

प्रकल्पाचा आवाका 

१२१ जुन्या चाळींतील ९,६८९ रहिवाशांचे पुनर्वसन. 

एकूण भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा वापर. 

१६० चौ. फुटांत राहणाऱ्यांना ५०० चौ. फुटांचे घर मोफत. 

४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारणार. 

६ मजली पोडियम पार्किंगमध्ये फ्लॅटधारकास एकास एक पार्किंग. 

पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरणपूरक उद्यान.

स्वयंपूर्ण वसाहतीत काय ? 

स्वतंत्र व्यापारी संकुल, शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन आहे.

मलनिस्सारण प्रकल्प, सौरऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधाही देणार.
 

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde and MLA Aditya Thackeray are likely to appear on the same stage on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.