Join us  

राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंची वैयक्तिक भूमिका, भाजपाचा संबंध नाही; सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 1:56 PM

नारायण राणे यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. दरम्यान, भाजपाने नारायण राणेंच्या त्या मागणीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणे यांनी केलेली ही मागणी ही त्यांची वैयक्तिक मागणी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, ही भाजपाची मागणी नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

नारायण राणे यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. तसेच ठाकरे सरकारच्या स्थैर्याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येऊ लागले होते. अखेरीस भाजपाचे राज्यातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राणेंच्या मागणीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणे यांनी केलेली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, ही भाजपाची मागणी नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान,राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणेंनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी राणेंनी राज्यपालांकडे केली होती.  

राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करू शकत नाही. या सरकारमध्ये तितकी क्षमता नाही. राज्यात आतापर्यंत हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असे नारायण राणे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यानं त्यांना परिस्थिती हाताळता येत असल्याची टीकादेखील त्यांनी केली होती.

टॅग्स :नारायण राणे सुधीर मुनगंटीवारभाजपामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस