Join us

पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत सांगितले शहरासाठी नवीन नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:01 IST

Pimpri Chinchwad Rename news: पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला आहे. भाजपच्या आमदाराने विधान परिषदेत नामांतराची मागणी केली. 

मागील काही वर्षात राज्यात काही जिल्ह्यांचे नामांतर करण्यात आले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, तर अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी शुक्रवारी (११ जुलै) पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराची मागणी केली. पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार खापरे यांनी काही ऐतिहासिक दाखलेही सभागृहात दिले.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधान परिषदेत बोलताना उमा खापरे म्हणाल्या, "राज्यातील विविध जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर शिवभूमी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे, अशी मी मागणी करत आहे."

भोसरी बोज राजाचे संस्थान होते -आमदार खापरे

"शक्ती-भक्ती प्रतिष्ठान आणि इतर समाजाच्या वतीनेही सुद्धा ही मागणी होत आहे. पिंपरी चिंचवड शहराला पीसीएमसी असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. पण, पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशी तीन गावे मिळून शहर आहे. भोसरी हे भोज राजाचे संस्थान असल्याचा दाखलाही इतिहासात उपलब्ध आहे", असे आमदार खापरे यांनी सभागृहात सांगितले. 

स्वराज्याची निर्मिती करण्यात जिजाऊंचे मोलाचे मार्गदर्शन

"ऐतिहासिक महत्त्व असल्याने पिंपरी चिंचवड शहराला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे. त्या काळात राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची निर्मिती करून स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज दिले आहेत. ३५० वर्षांच्या इतिहासात राजमाता जिजाऊंनी दिलेला वारसा आजही कायम असून, त्यांनी शिवाजी महाराजांना मराठी भाषा, मराठी प्रांत वाढवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे", असेही खापरे म्हणाल्या.

वाचा >>प्रेयसी गर्भवती राहिली, इंजिनिअर तरुणाने थेट...; तरुणी पुण्यात आल्यावर फुटलं सगळं बिंग

"छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट चिंचवडमधील मंगलमूर्ती वाड्यामध्येही झाली होती. हा चिंचवडचा इतिहास आहे. अशा ऐतिहासिक नगरीचे नाव राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे", अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली.  

टॅग्स :पिंपरी-चिंचवडभाजपाआमदारविधान परिषद