अडीच वर्षांत पदवी, वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन! यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:31 IST2024-12-06T08:29:10+5:302024-12-06T08:31:47+5:30

जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार ‘एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल.

Degree in two and a half years, college admission twice a year! Draft of new regulations issued by UGC | अडीच वर्षांत पदवी, वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन! यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी

अडीच वर्षांत पदवी, वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन! यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा चर्चेसाठी जारी केला असून, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांची डिग्री आता अडीच वर्षांत मिळविता येणार आहे. तर चार वर्षांची ऑनर्स डिग्री तीन वर्षांत प्राप्त करता येणार आहे. तर कॉलेजला वर्षातून दोनदा ॲडमिशन घेण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.

जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार ‘एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल. त्यामुळे तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षांमध्ये, तर चार वर्षांची डिग्री तीन किंवा साडेतीन वर्षांमध्ये मिळविण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुला झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्या पदवीसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

तसेच कमी झालेल्या कालावधीतच डिग्रीसाठी आवश्यक क्रेडिटही प्राप्त करावे लागतील. तर ‘एक्स्टेंडेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचा कालावधी वाढविता येईल. त्यामुळे तीन किंवा चार वर्षांची पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त एक वर्षाचा किंवा दोन सत्रांचा कालावधी मिळू शकणार आहे.

५० टक्के स्किल कोर्स, अप्रेंटिसशिपला

विद्यार्थ्यांना एखाद्या विद्याशाखेची डिग्री मिळविण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला त्या विद्याशाखेतील ५० टक्के अभ्यासक्रम घ्यावे लागणार आहेत. यानुसार विद्यार्थ्यांना त्या विद्याशाखेचे ५० टक्के क्रेडिट मिळवावे लागतील. त्याच्या जोडीला विद्यार्थी उर्वरित ५० टक्के क्रेडीट हे स्कील कोर्सेस, अप्रेंटिसशिप आणि अन्य विद्याशाखांतील विषय घेऊन मिळवू शकतील.

उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये, तसेच जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कॉलेजांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. पाश्चात्य देशांच्या धर्तीवर हा नवा पर्याय भारतीय विद्यार्थ्यांनाही मिळणार असून त्यातून एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण वर्ष वाट पाहावी लागणार नाही.

आगामी काळात शिक्षण संस्थांमध्ये दोन सत्रांमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्याशाखेच्या व्यतिरिक्त अन्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ संबंधित विद्याशाखेची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पातळीवरील अथवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, असेही या मसुद्यात नमूद आहे. नव्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

शिक्षण संस्थांना या गोष्टी कराव्या लागणार

 अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या १० टक्के विद्यार्थ्यांनाच एक्सलरेटेड डिग्रीचा पर्याय देता येईल. एक्स्टेंडेड डिग्रीसाठी विद्यार्थी संख्येची कोणतीही अट नसेल.

 संस्थांनी नियुक्ती केलेली समिती विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय सत्रातील गुणवत्तेवरून त्यांची एक्सलरेटेड डिग्रीसाठी निवड करेल. त्यामध्ये विद्यार्थ्याची कमी कालावधीत क्रेडिट मिळविण्याची क्षमता तपासली जाईल.

Web Title: Degree in two and a half years, college admission twice a year! Draft of new regulations issued by UGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.