Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:55 IST2025-10-31T13:53:32+5:302025-10-31T13:55:54+5:30
Deepak Kesarkar And Rohit Arya : दीपक केसरकर यांच्या घरासमोर रोहित आर्याने अनेकदा उपोषणही केलं होतं. यावर आता केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
मुंबईमध्ये 'अ थर्सडे' या चित्रपटाप्रमाणे अपहरणाचा थरार घडला. ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या १५ वर्षाखालील १७ मुलांसह २० जणांना रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवल्याच्या घटनेने गुरुवारी खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचा एन्काउंटर केला आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली.
रोहित आर्याने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा'ची २ कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप केला होता. या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत, जाणीवपूर्वक त्याच शाळांची विजेते म्हणून निवड केली असा गौप्यस्फोटही त्याने केला.
"मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"
तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषणही केलं होतं. यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी समजा मुंबईत असतो तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो" असं म्हटलं आहे. "एक गोष्ट अशी आहे की अशा सेन्सेटिव्ह प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्याने जर मुलांना काही केलं तर ते फार अडचणीचं ठरतं. पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली, हे अतिशय योग्य आहे."
थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
"मी समजा मुंबईत असतो तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. परंतू फोनवर बोलताना जर एखादी बाब त्याला खटकली असती आणि त्याने मुलांना काही केलं असतं तर मग वेगळाच अनर्थ झाला असता" असं केसरकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटलं आहे. रोहित आर्या याने "शिक्षण विभागाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातून मला परस्पर वगळले. त्यामुळे गेल्यावर्षी जुलै महिन्यात उपोषणाला सुरुवात केली. मात्र मंत्री केसरकर यांच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेतले."
"कामाचे पैसे नंतरही न मिळाल्याने पुन्हा ऑगस्ट महिन्यात उपोषण केले. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. अखेर वैतागून केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले. तेव्हा केसरकर यांनी मला वैयक्तिक मदत म्हणून ७ लाख आणि ८ लाख असे दोन धनादेश दिले आणि उर्वरित रक्कम ४ ऑक्टोबरला देण्याचे आश्वासन दिले परंतु आतापर्यंत उर्वरित रक्कम मिळाली नाही" असं म्हटलं होतं.