घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 05:39 AM2019-04-09T05:39:03+5:302019-04-09T05:39:56+5:30

मुंबईच्या सहाही मतदारसंघांत सोमवारी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुकांच्या वेळी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Declaration war, power demonstration and chess! | घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन!

घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन!

Next

मुंबईच्या सहाही मतदारसंघांत सोमवारी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुकांच्या वेळी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बंदी असूनही परस्परांविरोधात घोषणा देण्यात आल्या. चोर आणि चौकीदार असे उल्लेख करत परिसर दणाणून टाकण्यात आला. जेव्हाजेव्हा कार्यकर्ते आमनेसामने आले, तेव्हा खुन्नस देण्याचे, ठसन देण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे मुंबईत पुढील साधारण २० दिवस कशी राजकीय लढाई लढली जाईल, त्याची चुणूक मिळाली.


मुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील आज ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात विद्यमान खासदार आणि शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे, काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड या प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज सादर केला.
राहुल शेवाळे यांनी अर्ज सादर करण्यापुर्वी सहकुटुंब सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील पुतळ्याला पुष्प अर्पण करून शेवाळे यांनी माहीम दर्ग्यात जाऊन चादर चढविली. त्यानंतर सीएसएमटी येथील पोस्ट आॅफिस कार्यालयाजवळून महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत शोभायात्रेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी कार्यकर्ते, ढोल-ताशांची पथकांच्या साथीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याप्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह स्थानिक शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी थेट कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, आमदार वर्षा गायकवाड आदी नेते उपस्थित होते.



काँग्रेस कार्यकर्त्यांची ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल
केला. त्यांच्यासोबत असलेल्या संजय दत्त यांना पाहण्यासाठी व त्यांच्या सोबत छायाचित्र काढण्यासाठी या वेळी झुंबड उडाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वेळी ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी केली.मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते.
या वेळी दत्त यांचे पती, बंधू अभिनेता संजय दत्त यांच्यासह माजी मंत्री आमदार आरिफ नसीम खान, बाबा सिद्दिकी, कृपाशंकर सिंह,
हाजी इब्राहिम शेख, माजी आमदार अशोक जाधव, बलदेव खोसा, नगरसेवक अश्रफ आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक,
नगरसेवक कप्तान मलिक आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १०० मीटरच्या आत घोषणाबाजी करण्यास, घोळक्याने उभे राहण्यास मनाई असतानाही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते.



शिवसेना-काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण मुंबईतील लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे ओल्ड कस्टम हाउस येथे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उभय पक्षांच्या उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन
केले. या वेळी शिवसेना-काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही काळ तणाव पसरला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मात्र या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रसंग टळला.


उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली पहिली मिरवणूक शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांची होती. परंतु कार्यकर्ते पोहोचण्याआधीच सावंत हजर झाल्यामुळे त्यांना काही वेळ ताटकळत उभे राहावे लागले. अखेर धावपळ करून कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात आली; आणि सकाळी १० वाजता फोर्ट येथून मिरवणूक निघाली. ही मिरवणूक म्हणजे युतीच्या कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शनच ठरले. दोन्ही पक्षांचे झेंडे फडकवित कार्यकर्ते युतीच्या एकजुटीचा जयघोष करीत पुढे सरकत होते.
दक्षिण मुंबईतील गिरणी कामगाराची कन्या वैजयंती गावडे, बेरोजगार तरुण हृषीकेश गुहागरकर, किराणा व्यापारी चंद्र चावडा आणि त्यांचा मुलगा जिगर चावडा हे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीचे सूचक होते. तसेच त्यांनी आपल्या वतीने उमेदवारीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मिलिंद देवरा यांच्या वतीने भरले.

भाजप सरकारच्या धोरणाचा फटका बसल्यामुळे या उमेदवारांनी आपल्याला समर्थन दिल्याचे देवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाइकवर स्वार होऊन झेंडा फडकवित काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने दुपारच्या रणरणत्या उन्हात ओल्ड कस्टम हाउसच्या दिशेने रवाना होत होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट या परिसरात मोठी वाहतूककोंडीही निर्माण झाली.

Web Title: Declaration war, power demonstration and chess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.