Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:23 PM2021-12-06T18:23:52+5:302021-12-06T18:28:36+5:30

राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

The decision on lockdown will be taken only after discussions with the CM Uddhav Thackeray Task Force and the Central Government, informed Health Minister Rajesh Tope. | Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

Next

मुंबई: जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.

राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता. 

ओमायक्रोनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परदेशातून आलेल्या १०० टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत. 

राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करुनच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. तसेच राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता देशातही मोठ्या वेगाने सापडू लागले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीचे दोन डोस घेतलाला व्यक्तीही संक्रमित होत आहे. याचाच अर्थ तुम्ही लस घेतली असेल तरी देखील ओमायक्रॉन तुम्हाला बाधित करू शकतो. यामुळे कोरोनाचे नियम पाळणे, काळजी घेणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.

आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले जे रुग्ण सापडले आहेत. ते हल्लीच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून आलेले होते किंवा हाय रिस्क देशांमधून प्रवास करून आलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. कारण अनेक संशयित रुग्णांचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे ट्रेसिंगही करण्यात आले आहे.

Web Title: The decision on lockdown will be taken only after discussions with the CM Uddhav Thackeray Task Force and the Central Government, informed Health Minister Rajesh Tope.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app