मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार, बेवड्यांना समर्पित अन् सर्वात भ्रष्टाचारी ठाकरे सरकार; फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:25 IST2022-03-02T13:24:59+5:302022-03-02T13:25:20+5:30
"मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक आज कोठडीत असूनही ठाकरे सरकारनं त्यांचा राजीनामा घेतलेला नाही."

मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार, बेवड्यांना समर्पित अन् सर्वात भ्रष्टाचारी ठाकरे सरकार; फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई
मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक आज कोठडीत असूनही ठाकरे सरकारनं त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच घडलं आहे. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी अधिवेशनात भाजपा संघर्ष करेल, असा हल्लाबोल राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपा नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार टीका केली.
"मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी प्रकरणात एका मंत्र्याला तुम्ही पाठिशी घालत आहात आणि विशेष म्हणजे मुंबई आमची अशी भाषा करणाऱ्या शिवसेनेनं नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचाही खरा चेहरा आता समोर आला आहे. हे सरकार दाऊदला समर्पित सरकार आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे सरकार हे सावकारी सरकार, अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही
"राज्यात आज अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. राज्यातील अनेक मुद्दे मांडण्याची आमची तयारी आहे. पण सरकारनंही हे अधिवेशन नीट सहकार्यानं चालवायला हवं. राज्यातील शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जात आहेत. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत असा शब्द दिला होता. त्यानंतर मीटर कापावे लागतील असे शेवटच्या दिवशी म्हणाले. म्हणजेच त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये काहीच किंमत नाही हे सिद्ध झालं आहे. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बेवड्यांना समर्पित सरकार
महाविकास आघाडी सरकार हे फक्त बेवड्यांसाठी काम करतं. मद्य व्यवसायाला हवा तसा पाठिंबा देतं. हे सरकार बेवड्यांना समर्पित असलेलं सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार ठाकरे सरकारच्या काळात झाला आहे, असाही दावा फडणवीसांनी यावेळी केला. तसंच राज्याच्या इतिहासात ठाकरे सरकारची ओळख आजवरचं सर्वात भ्रष्टाचारी सरकार अशी नोंद केली जाईल, असंही ते म्हणाले.