जेवणात आढळला मेलेला उंदीर, वरळीच्या ‘त्या’ हाॅटेलला नोटीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:46 AM2024-01-18T05:46:58+5:302024-01-18T05:47:32+5:30

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी नमुने घेतले असून, या संदर्भात एफडीएने रेस्टाॅरंटला सुधारणा नोटीस पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Dead mouse found in food, notice to 'that' hotel in Worli, action taken by Food and Drug Administration | जेवणात आढळला मेलेला उंदीर, वरळीच्या ‘त्या’ हाॅटेलला नोटीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जेवणात आढळला मेलेला उंदीर, वरळीच्या ‘त्या’ हाॅटेलला नोटीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : वरळी येथील बार्बेक्यू नेशन या रेस्टॉरंटच्या जेवणात मृत उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ॲड. राजीव शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनच्या एका पार्सलमध्ये शाकाहारी जेवण मागविले होते. त्यांनी ते अन्न खाण्यास सुरुवात केली असता त्यांना त्यात मेलेला उंदीर आढळला, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी नमुने घेतले असून, या संदर्भात एफडीएने रेस्टाॅरंटला सुधारणा नोटीस पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राजीव शुक्ला पर्यटनासाठी मुंबईत आले होते. त्यांनी ८ जानेवारीला बार्बेक्यू नेशनच्या वरळी आउटलेटवरून रात्रीचे जेवण मागविले होते. शुद्ध शाकाहारी असलेल्या शुक्ला यांनी जेवणाच्या पाकिटातून ‘दाल मखनी’ काढली आणि ती खायला सुरुवात केली तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर दिसला. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे शुक्ला यांना पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ते तीन दिवस उपचार घेत होते. शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, प्रयागराजहून ८ जानेवारीला ते मुंबईत आले होते. जेवणाचे पार्सल आल्यानंतर  डाळीच्या डब्यात मेलेला उंदीर आढळला. शुक्ला यांनी त्यांचा अनुभव एक्स या समाज माध्यम मंचावर विदित केला आहे. 

रेस्टॉरंट म्हणते...
 बार्बेक्यू नेशनने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, राजीव शुल्का नावाच्या व्यक्तीने तक्रार केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आमच्या एका शॉपमधून ८ जानेवारीला जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांनी ऑर्डर केलेल्या पदार्थामध्ये मेलेला उंदीर आढळल्याचा आरोप केला आहे. 
 या प्रकरणाची दखल घेत आहोत. यासंदर्भात चौकशीदेखील केली आहे. मात्र, अशा कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांकडूनही तपासणी करून घेतली आहे. 
 या प्रकरणासंदर्भात पुढील कोणत्याही प्रकारच्या तपासणीत अधिकारी किंवा पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही पत्रकात म्हटले आहे. 

 पोलिसांनी अन्नाचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल येण्यास २-३ दिवस जातील. घटनेच्या ४-५ दिवसानंतर तक्रार केल्यामुळे त्यावेळी काही आढळले नाही. याबाबत अंतिम अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. याशिवाय, रेस्टाॅरंटच्या तपासणीदरम्यान अधिकृत कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.
- लक्ष्मीकांत सावळे, 
अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग

Web Title: Dead mouse found in food, notice to 'that' hotel in Worli, action taken by Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.