"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:45 IST2025-01-23T10:41:07+5:302025-01-23T10:45:26+5:30

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.

DCM Ajit Pawar commented on the statement made by Minister Nitesh Rane on the attack on actor Saif Ali Khan | "सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..."

"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..."

Nitesh Rane on Saif Ali Khan Attack: सहा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता सैफ अली खान आपल्या घरी परतला. सैफवर आठवड्याभरापूर्वी वांद्रे येथील घरात बांगलादेशी घुसखोराकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून सैफ थोडक्यात बचावला आहे. मात्र रुग्णालयातून घरी परतताना सैफ अगदी व्यवस्थित दिसत होता. सैफच्या प्रकृतीवरुन आता महायुतीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर मंत्री नितीश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सैफवर चाकू हल्ला झाला होता की तो फक्त अभिनय करतोय? असा सवाल नितेश राणेंनी केलाय.

अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मंत्री नितीश राणे यांनीही आपले मत व्यक्त करत सैफ अली खानवर खरोखरच चाकूने हल्ला झाला होता की सैफ अली खान फक्त अभिनय करत होता असा सवाल केला आहे.  सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची चिंता केली नाही. त्याला फक्त खान कलाकारांचीच काळजी आहे, असंही नितेश राणे म्हणाले. नितेश राणे पुण्यातील आळंदीत बोलत होते.

"बांगलादेशवाले काय करत आहेत बघा. ते आता मुंबईत काय करतं आहेत पाहिलं ना? सैफ अली खानच्या घरात घुसला बांगलादेशी. पूर्वी बांगलादेशी नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसत आहेत. कदाचित सैफ अली खानला बांगलादेशमध्ये घेऊन जायला घुसला असेल आज सैफ अली खानला पाहिल्यानंतर मला संशय आला. तो बाहेर येऊन असा चालत होता की मलाच शंका आली की याला खरंच चाकू मारला की अभिनय करत होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर असं टुणूक टुणूक चालत होता. वाटतच नव्हतं की त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे," असं नितेश राणे म्हणाले. कोणताही खान अडचणीत आला की सगळे आपापसात भांडायला लागतात, असंही नितेश राणे म्हणाले.

"सुशांत सिंह राजपूतचे काय झाले? त्यानंतर जितेंद्र आव्हाड पुढे आले नाहीत. बारामतीच्या ताई बाहेर आल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांना सैफ अली खानची काळजी आहे. शाहरुख खानच्या मुलाबद्दल चिंता आहे. नवाब मलिक चिंता करतात. तुम्ही त्यांना कधी हिंदू कलाकाराबद्दल काळजी करताना ऐकले आहे का?," असाही सवाल नितेश राणेंनी केला.

मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी सवाल विचारला. त्यावर बोलताना मला याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असं अजित पवार यांनी म्हटलं. "मी तुमच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री म्हणून बोलतो. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींने केलेल्या वक्तव्यावर मला विचारता. कालच ते माझ्याकडे त्यांच्या खात्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. बाकी मला याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन. एखाद्याच्या मनात वेगळं काही आलं तर ते त्याचे मत आहे. त्यांच्या मनात वेगळं काही असेल तर पोलीस खात्याला सांगावं. मी पण पोलीस खात्याला सांगेन की एखाद्याच्या मनात शंका-कुशंका आहेत, असं अजित पवार म्हणाले.
 

Web Title: DCM Ajit Pawar commented on the statement made by Minister Nitesh Rane on the attack on actor Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.