सगळ्या मुंबईचा डान्सबार! राज ठाकरे चुकीचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:00 AM2024-01-15T11:00:35+5:302024-01-15T11:00:58+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर केलेल्या रोषणाईला ‘डान्सबार’ लायटिंग म्हटले त्यात काही वावगे नाही.

Dance bar of all Mumbai! How wrong is Raj Thackeray? | सगळ्या मुंबईचा डान्सबार! राज ठाकरे चुकीचे कसे?

सगळ्या मुंबईचा डान्सबार! राज ठाकरे चुकीचे कसे?

- संदीप देशपांडे
(प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा बकालपणा झाला आहे. जो चिखल झाला आहे, त्याचं काय? राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय कळत नाही. मुंबईत खांबावर लाइट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. मुंबईच्या सुशोभीकरणावरून मनसेने सरकारच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. सुशोभीकरणाच्या कामात कुठेच सुसूत्रता नसून, हा पैशांचा अपव्यय असल्याचा हल्लाबोल मनसेने केला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर केलेल्या रोषणाईला ‘डान्सबार’ लायटिंग म्हटले त्यात काही वावगे नाही. कारण कुठे झाडावर, कुठे पथदिव्यांवर वाट्टेल तिथे रोषणाई करण्यात आली आहे. कुठे फुलपाखरं, कुठे बगळे तर कुठे आणखी काही. कुठेच सुसूत्रता नसल्याने पैशांच्या अपव्ययाशिवाय सरकारने नेमके काय साधले, हे कळण्यापलीकडे आहे. माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी सोन्याचा कमोड लावेन, असेच हे वागणे आहे.
लंडनसारख्या शहराची जशी एक वेगळी ओळख आहे, तशीच ओळख मुंबईची आहे. लाल रंगाच्या बेस्ट बसेस, इथले बस स्टॉप, फुटपाथ यातून ही ओळख अधोरेखित होत होती. मात्र आज पाहायला गेले तर बेस्ट बसेसचा लाल किंवा भगवा रंग हरवला. या बसेस जाहिरातींनीच भरलेल्या दिसतात. बसथांब्यांमध्ये कोणतेही साधर्म्य नाही. कुठे एलईडी इंडिकेटर तर कुठे अजिबातच काही नाही, अशी अवस्था आहे. फुटपाथचे तर नाना प्रकार झाले आहेत. कुठेच सुसूत्रता, एकसमानता दिसून येत नाही. 
कोणा आमदाराला वाटले की, माझ्या परिसरात असे व्हायला पाहिजे तशा पद्धतीने लायटिंग, स्ट्रीट फर्निचर घडवले जात आहे. यातून मुंबईचे सौंदर्यीकरण कसे साधणार आहे?
मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी सरकारने हजारो कोटींची तरतूद केली आहे. हा करदात्यांचा पैसा आहे, पण प्रत्यक्षात हे सर्व पाहिल्यानंतर या पैशांचा हा अपव्ययच होताना दिसत आहे. वास्तविक पाहता सुनियोजित पुनर्विकास करण्यासाठी शहरी विकासातील तज्ज्ञ संस्थांची मदत घ्यायला हवी. आयआयटीतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या नजरेतून मुंबईचे सौंदर्यीकरण कसे करता येईल, यासाठी सल्ला घ्यायला हवा. या माध्यमातून खऱ्या अर्थाने आणि कमी खर्चात ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा हेतू साध्य होईल.

Web Title: Dance bar of all Mumbai! How wrong is Raj Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.