Cyclone Tauktae Updates: पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु; मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:22 IST2021-05-17T15:39:35+5:302021-05-17T16:22:01+5:30
Cyclone Tauktae Updates: जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली असून मनुष्यहानी मात्र कुठेही झाली नाही.

Cyclone Tauktae Updates: पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु; मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा
मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे वाहत असलेले वेगवान वारे व सुरु असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक १७ मे २०२१ रोजी गेट वे ऑफ इंडियापासून चौपाटीच्या पाहणीला प्रारंभ करून मुंबईतील एकंदरीत जनजीवनाचा आढावा घेतला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी- फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून बृहन्मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
तौक्ते चक्रीवादळ व पावसाची सुरु असलेली सततधार लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक १७ मे २०२१ रोजी वरळी सी फेस येथे पाहणी व आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले.@AUThackeray@mybmc@ShivsenaCommspic.twitter.com/u6krBh8KDp
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) May 17, 2021
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली असून मनुष्यहानी मात्र कुठेही झाली नाही. वृक्ष कोसळण्याच्या घटनांबाबत संबंधित त्या-त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना भ्रमणध्वनीद्वारे अवगत करीत असल्याचे महापौर म्हणाल्या. अग्निशमन दलातर्फे तातडीने वृक्ष हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच काही किरकोळ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहे. एनडीआरएफच्या टीम ठीकठिकाणी तैनात करण्यात आल्या असून पोलीस गस्त घालून वाहतूक सुरळीत करीत आहे.
पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले असून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले. या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून असून तातडीच्या योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. जोरदार वादळीवारे असल्यामुळे नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.