Join us

हंगाम चक्रीवादळाचा : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आठवडाभर पाऊस कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 15:53 IST

Cyclone season : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रीय झाला.

 

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रीय झाला असून, १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात कोकणासह आतल्या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय गडगडाटासह जोरदार वारे वाहतील. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रीय राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, समुद्र खवळलेला राहील. तर ताशी ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील, अशीही शक्यता आहे.हवामान बदलाचा परिणाम मुंबईवरही झाला आहे. रविवारी मुंबई दिवसभर ढगाळ होती. दाटून आलेल्या ढगांसह झालेल्या काळोखामुळे मुसळधार पाऊस पडेल, असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात सकाळ आणि दुपार कोरडीच गेली. किंचित कुठे तरी एखाद दुसरी सर कोसळली होती. या पावसाची नोंद जेमतेम १.४ मिलीमीटरच्या आसपास झाली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार नाही. कारण कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होण्यासाठी ही सिस्टीम समुद्रात अधिक काळ असणे अपेक्षित असते. मात्र सोमवारी हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्रप्रदेशच्या किनारी धडकणार आहे. त्यामुळे त्याचा फटका भारतीच्या पूर्व किना-यासह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही बसणार आहे.

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईमहाराष्ट्रमुंबई मान्सून अपडेट