सतर्क रहा! सायबर गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड; एका चुकीच्या 'क्लिक'मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:42 IST2026-04-02T17:41:10+5:302026-04-02T17:42:20+5:30
Cyber Crime Safety Tips:सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी विचार करा आणि सतर्क राहून आपले कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा.

सतर्क रहा! सायबर गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड; एका चुकीच्या 'क्लिक'मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे!
मुंबई : पूर्वी फक्त फेक डीलरशिप ऑफर येत असे. आता गॅसटंचाईच्या अफवेचा फायदा घेत ‘तातडीची बुकिंग’ आणि ‘इन्स्टंट डिलिव्हरी’वर भर दिला जात आहे. व्हॉटस्ॲप, एसएमएस, सोशल मीडियावर जाहिरातींमधून फेक लिंक्स येतात. एपीके फाइल्स आणि यूपीआय फ्रॉड नवीन ट्रेंड आहेत. फेक वेबसाइट्स अधिकृत पोर्टलसारख्या डिझाइन केल्या जातात. गुन्हेगार आता मोबाइल नंबर, एलपीजी आयडी, पत्ता यांची माहिती प्रथम घेऊन विश्वास संपादन करतात. १९३० हेल्पलाइनवर अशा तक्रारींची संख्या अचानक वाढल्याचे सायबर कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी सांगितले.
गॅस टंचाईच्या अफवेचा गुन्हेगारांकडून फायदा
माळी यांनी सांगितले, सध्याच्या काळात एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित फेक मेसेज, व्हॉटस्ॲप लिंक्स आणि फोन कॉल्स यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे गॅसटंचाईची अफवा पसरल्याने सायबर गुन्हेगारांनी याचा फायदा घेतला आहे. इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस यांच्या नावाने खोट्या एसएमएस, व्हॉटस्ॲप मेसेज पाठवून लोकांना फसवले जात आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थानसह देशभरात अशा तक्रारी वाढल्या आहेत. एका क्लिकमुळे बँक खाते रिकामे होण्याच्या घटना घडत आहेत.
कशी होते फसवणूक?
गुन्हेगार गॅस एजन्सीचे प्रतिनिधी म्हणून फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. तुमचे एलपीजी कनेक्शन डिस्कनेक्ट होणार आहे, केवायसी अपडेट करा, सबसिडी थांबली आहे, आज बुक करा, उद्या डिलिव्हरी, असे भयानक संदेश पाठवतात. काही मेसेजमध्ये पे नाऊ, गेट गॅस टुमॉरो, असा आकर्षक ऑफर देतात. क्लिक केल्यावर फेक वेबसाइट उघडते, जी अधिकृत पोर्टलसारखी दिसते. तिथे बँक डिटेल्स, यूपीआय पिन, ओटीपी किंवा आधार कार्ड माहिती मागितली जाते. काही वेळा गॅस बिल अपडेट या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाइलमध्ये मालवेअर टाकतात. एकदा ओटीपी शेअर झाला की बँक खात्यातून पैसे वळवले जातात. स्क्रीन शेअरिंग ॲप (एनीडेस्क) डाउनलोड करायला सांगून थेट खाते हॅक केले जाते.
नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कशी काळजी घ्यावी?
केवळ अधिकृत ॲप्स / वेबसाइटस्वर बुकिंग करा
अनोळखी लिंक्स, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक्स कधीही क्लिक करू नका.
कोणत्याही फोनवर ओटीपी, यूपीआय पिन, बँक डिटेल्स शेअर करू नका. अधिकृत एजन्सी असे कधीही मागत नाही.
डिस्काउंट किंवा तातडीची डिलिव्हरीचे आमिष दाखवणारे मेसेज दुर्लक्षित करा.
संशयास्पद मेसेज आला तर गॅस एजन्सीला थेट फोन करून खात्री करा.
फसवणूक झाली तर तातडीने १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. बँकेला ताबडतोब माहिती द्या.
मोबाइलवर ॲंटिव्हायरस ठेवा आणि अनोळखी एपीके डाउनलोड करू नका.