अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 06:42 IST2025-04-20T06:41:38+5:302025-04-20T06:42:27+5:30
Kidney Donor Swap Registry: केंद्रीय आरोग्य मंत्रालयालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (नोटो) अशा पद्धतीची राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या.

अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
मुंबई : व्यक्तीला स्वतःची एक किडनी रक्ताच्या नात्यातील रुग्णाला देता येते; मात्र किडनी जुळत नसलेली दोन कुटुंबे एकत्र येऊन दात्यांची अदलाबदल करत किडनी दान करतात. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असे म्हणतात. यासाठी किडनी जुळत नसलेल्या कुटुंबीयांची स्वॅप रजिस्ट्री असणे गरजेची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (नोटो) अशा पद्धतीची राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सर्व राज्यांतील स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) यांना दिले आहेत.
चेंबुर येथे देशातील पहिली अपेक्स किडनी स्वॅप रजिस्ट्री तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे आतापर्यंत १०० पेक्षा अधिक किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये नातेसंबंध नसलेले दोन दाते आणि दोन रुग्णांचा समावेश असतो.
जवळचे नातेवाईक किडनीदान करू इच्छित असले तरी रक्तगट आणि किडनी जुळत (मॅच) नाही; मात्र दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांसोबत हे दोन्ही मॅच झाल्यास त्याचे प्रत्यारोपण म्हणजे ‘स्वॅप ट्रान्सप्लांट’ केले जाते.
स्वॅप रजिस्ट्री म्हणजे काय?
किडनी निकामी झालेल्या रुग्णाला कुटुंबातीलच सदस्य किडनी देण्यास तयार असतो. मात्र त्याचा रक्तगट जुळत नाही. मात्र या किडनी दात्याचे आणि रुग्णाचे रजिस्ट्रीमध्ये नाव नोंदविले जाते. ज्यावेळी त्यांचा रक्तगट जुळणारे दुसरे कुटुंब येते तेंव्हा दोन कुटुंबातील दात्यांची अदलाबदल करून ट्रान्सप्लांट करतात.
सर्व राज्यांना पत्र
राष्ट्रीय स्तरावर ‘नोटो’ ही संस्था अवयवदान नियमन करते, तर राज्यात ‘सोटो’ ही संस्था. ‘नोटो’ने १६ एप्रिलला राज्यांना पत्र पाठवून ‘वन नेशन वन स्वॅप ट्रान्सप्लांट प्रोग्राम’ तयार करण्यासाठी सहभाग घेण्याचे कळवले. रजिस्ट्री तयार झाल्यास रक्तगट जुळत नाही म्हणून ट्रान्सप्लांटसाठी थांबण्याची गरज नाही.