धारावी पुनर्विकासात देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 06:31 AM2023-12-17T06:31:49+5:302023-12-17T06:32:20+5:30

धारावीचा पुनर्विकास सरकारनेच करावा, ५०० स्क्वेअर फुटांचे घर द्या

Country's Biggest TDR Scam in Dharavi Redevelopment; Serious accusation of Uddhav Thackeray | धारावी पुनर्विकासात देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

धारावी पुनर्विकासात देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट देतानाच अदानी समूहाकडे टीडीआरचे हक्क जाणार आहेत. भविष्यात ज्यांना टीडीआर हवा असेल त्यांना अदानी समूहाकडूनच तो विकत घ्यावा लागेल. महायुती सरकारचा हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी केला. धारावीतून निघालेला मोर्चा अदानींच्या बीकेसी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजप, अदानी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.   

अदानींचे निर्णय २०१८ मध्ये झाल्याचे भाजपने सांगितले. त्यावेळी त्यांचेच सरकार होते. आम्ही त्यांना फक्त साथ देत होतो. त्यामुळे हे आमचे पाप नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले अभ्युदय नगर, देवनार, धारावी, मिठागरे, विमानतळ, मोतीलाल नगर, आदर्श नगर आणि टीडीआर. सगळ्याच गोष्टी अदानींना द्यायच्या असतील तर उद्या हे लोक मुंबई महाराष्ट्रापासून तोडतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते होऊ देणार नाही. धारावीचा विकास बीडीडी चाळीसारखा सरकारने स्वतः केला पाहिजे. धारावीकरांना ५०० स्क्वेअर फुटांचे घर मिळालेच पाहिजे. ज्यांचे व्यवसाय ज्या जागेत आहेत, तिथेच त्यांना व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे. पोलिसांनी दबाव आणून धारावीतल्या लोकांवर कारवाया केल्या तर त्या हाणून पाडल्या जातील, पोलिसांनी यात पडू नये. तुम्ही तुमचे ब्रीद सोडू नका, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारांबद्दल किंवा अनियमिततेबद्दल प्रश्न उपस्थित केला, तर भाजप नेते उत्तर देतात. आम्ही आमच्या लोकांच्या हक्कासाठी प्रश्न उपस्थित करतो, तर राज्य सरकारमधील अदानींचे मित्र आम्हाला विकासविरोधी म्हणतात.  आम्ही अदानींना विरोध करतो, तर हे लोक आम्हाला देशद्रोही म्हणतात. अदानींना विरोध हा देशद्रोह कसा? इथल्या एक लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे पाच ते सात लाख लोकांना बेघर करण्याचे काम मोदी सरकार अदानींच्या माध्यमातून करत आहे.
    - प्रा. वर्षा गायकवाड,
    अध्यक्षा, मुंबई प्रदेश काँग्रेस 

Web Title: Country's Biggest TDR Scam in Dharavi Redevelopment; Serious accusation of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.