खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:43 IST2025-12-14T10:42:57+5:302025-12-14T10:43:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातावरणात होत असलेल्या अचानक बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे.

खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातावरणात होत असलेल्या अचानक बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. विशेषतः सकाळी आणि रात्री हवेत जाणवणारा गारवा, दिवसा वाढलेले तापमान तसेच प्रदूषणात झालेली वाढ यामुळे अनेकांना घशात खवखव, कोरडेपणा, खवखवणारा खोकला आणि आवाज बसण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.
सध्या शहरात ऋतुबदलाची प्रक्रिया सुरू असून आर्द्रता आणि तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. सकाळी थंडावा आणि दुपारी उष्णता यामुळे शरीराला जुळवून घेणे कठीण जाते. याचा सर्वाधिक परिणाम श्वसनमार्गावर होतो. घसा कोरडा पडणे, खवखव होणे, घशात जळजळ जाणवणे ही याची सुरुवातीची लक्षणे असल्याचे डॉक्टर सांगतात.
याशिवाय वाढते वायुप्रदूषण, रस्त्यांवरील धूळ, वाहनांचे धूर आणि बांधकामांमुळे हवेत असलेले सूक्ष्म कण श्वसनसंस्थेला त्रासदायक ठरत आहेत. अनेक नागरिकांना सर्दी नसतानाही घशात खवखव जाणवत असून काहींना खोकल्याचा त्रास वाढत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अॅलर्जी असलेल्या रुग्णांना या समस्येचा अधिक फटका बसत आहे.
कोणती काळजी घ्याल?
पुरेसे पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे, थंड पेये आणि आईस्क्रीम टाळणे, तसेच धुळीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे उपयुक्त ठरते.
गरज नसताना एअर कंडिशनरचा अति वापर टाळावा. घरातील हवा स्वच्छ राहील याची काळजी घेणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
"वातावरण बदलाचा हा परिणाम आहे. घशातील खवखव दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा त्यासोबत ताप, तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याचे दिसून येत आहे. धुळीचे बारीक कण श्वसनाद्वारे शरीरात येतात. अनेक वेळा यामुळे कोरडा खोकला होतो. घसा लाल होतो. थंडीच्या मोसमात अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत असते. बदलत्या वातावरणात आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास या समस्यांपासून सहज बचाव करता येऊ शकतो."
- डॉ. श्रीनिवास चव्हाण,
कान, नाक, घसा विभागप्रमुख, सर जे.जे. रुग्णालय