Coronavirus: 'This is Worli Koliwada, not Jammu and Kashmir'; Youth video viral in Social media in lockdown pnm | Video: 'हा वरळी कोळीवाडा आहे, जम्मू काश्मीर नव्हे'; कर्फ्यूमध्ये अडकलेल्या तरुणाचा तीनही ठाकरेंसाठी 'मनसे' मेसेज

Video: 'हा वरळी कोळीवाडा आहे, जम्मू काश्मीर नव्हे'; कर्फ्यूमध्ये अडकलेल्या तरुणाचा तीनही ठाकरेंसाठी 'मनसे' मेसेज

ठळक मुद्देवरळी कोळीवाड्यात १० कोरोनाचे रुग्ण आढळलेखबरदारी म्हणून प्रशासनाने परिसरात कर्फ्यू लावलानागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने नाराजी

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईत कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण शहरातील दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला तर त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याची सुरुवात वरळी कोळीवाडा आणि धारावी याठिकाणाहून झाली आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे १० रुग्ण आढळून आले आहेत तर धारावीत २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

वरळी कोळीवाड्यात पोलिसांकडून कर्फ्यू लावण्यात आला असून याठिकाणी १०८ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वरळी कोळीवाडा हा दाट वस्तीचा रहिवाशी परिसर आहे. याठिकाणी छोट्या गल्लाबोळे असल्याने कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मागील ३ दिवसांपासून परिसरात कर्फ्यू लावल्यामुळे कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे.

मात्र या कर्फ्यूमुळे लोकांचे प्रचंड हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या परिसरात राहणाऱ्या पत्रकाराने याबाबत सोशल मीडियात वाचा फोडली आहे. कर्फ्यू गरजेचे आहे हे सगळं मान्य आहे पण लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू कशा मिळणार? काही प्रमाणात दूधाचं वाटप झालं आहे. सिलेंडर वाटत असताना एका ठिकाणी रांगेत नागरिकांना उभं केलं जात आहे. प्रत्येक घरातील २ माणसं सिलिंडेर घ्यायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी होते, ही परिस्थिती गंभीर आहे यात जर संक्रमण वाढलं तर प्रचंड प्रमाणात नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वरळी कोळीवाड्यात किराणा मालाच्या दुकानात माल संपला आहे, दुकाने उघडली तरी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. लोकांनीही याबाबत भान बाळगायला हवं. वरळी कोळीवाड्यात खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. कोळीवाड्यात कोणत्याही नागरिकाला काही त्रास झाला तर हे जाणार कुठे? लोक मरणाच्या दारावर उभे असताना एकमेकांशी साथ देऊन लढलं पाहिजे. सरकार त्यांची जबाबदारी पार पाडतेय पण लोकांनीही साथ द्यायला हवी. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गोष्टी बंद केल्या तर लोकांनी जगायचं कसं? असा प्रश्न सचिन गव्हाणे या पत्रकाराने उपस्थित केला आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे याच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी विनवणी केली आहे. प्रशासनाने किराणा मालाची दुकानं सुरु केल्यानंतर वरळीकरांनी दुकानात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं. लोकांनी सोशल डिस्टेंसिगची ऐशीतैशी केल्याचं दिसून येतं. सरकार जर लोकांना सहकार्य करत असेल तर लोकांनीही सहकार्य करा. घरात अन्नधान्याची साठवण करु नका, ज्यांना गरज आहे त्यांनाही अन्न मिळू द्या. या संकटाच्या काळात एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी सामारं जावं असं आवाहन सचिनने केलं आहे. त्याचसह यंत्रणेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर काही स्वयंसेवकांनीही पुढे येऊन लोकांना मदत करावी असंही सांगितले आहे.

 

Web Title: Coronavirus: 'This is Worli Koliwada, not Jammu and Kashmir'; Youth video viral in Social media in lockdown pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.