Join us

coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

By बाळकृष्ण परब | Updated: November 8, 2020 14:21 IST

Uddhav Thackeray News : कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे आणि अन्य प्रार्थनास्थळे बंद आहे. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे.

मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे आणि अन्य प्रार्थनास्थळे बंद आहे. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी विरोधी पक्ष असलेला भाजपा तसेच इतरांकडून आंदोलनाचाही इशारा दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. आता मंदिरंसुद्धा उघडली जातील. दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करू. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. आपले आजी आजोबा, आई-वडील अशा वृद्ध व्यक्ती मंदिरात जातात. तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत आहे.मंदिरात आरती करताना दाटीवाटी केली जाते. इतर प्रार्थनास्थळांवरही हीच परिस्थिती असते. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज अनेकांकडून अशी मागणी होत आहे. मात्र याचे विपरित परिणाम झाल्याच त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच मंदिरात प्रवेशासाठी गर्दी टाळणे आण मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत फटाके फोडू नका असे आवाहनही केले. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आपण गणपती, नवरात्र असे सण साजरे केले. खरंतर हे सण साजरे केले की पार पाडले हा प्रश्नच आहे. अनलॉक होत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दी ही जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढतो आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस