coronavirus: सीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 02:40 AM2020-10-25T02:40:54+5:302020-10-25T06:40:33+5:30

कोरोनाचं संकट कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. सरकारद्वारे सक्ती करून नव्हे, तर स्वेच्छा जनसहभागाद्वारे कोरोनामुक्तीचा लढा लढला गेला तरच ते खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीचे ‘सीमोल्लंघन’ ठरेल.

coronavirus: transgression of coronavirus! | coronavirus: सीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे !

coronavirus: सीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे !

Next

- स्वप्निल कुलकर्णी

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचंच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपायांचा सध्या अवलंब करावा लागेल. हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. सरकारद्वारे सक्ती करून नव्हे, तर स्वेच्छा जनसहभागाद्वारे कोरोनामुक्तीचा लढा लढला गेला तरच ते खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीचे ‘सीमोल्लंघन’ ठरेल.

नववर्षाची सुरुवात होते न होते तोच कोरोना नावाचे  मळभ या विश्वावर दाटून येण्यास सुरुवात झाली. गेले आठ महिने सर्व विश्व ‘कोरोना’चे काळे मळभ अनुभवत आहे. कोरोना आजही आहे आणि या विषाणूचा धोका तितकाच तीव्र आहे. अशा केविलवाण्या परिस्थितीत सूक्ष्म होऊन आपण आपलंच नुकसान करून घेण्यापेक्षा काहीतरी नावीन्य आपल्या आयुष्यात आणायलाच हवे. कोरोनाविरुद्धचा हा लढा त्यावरील लस उपलब्ध होईपर्यंत पुढील किमान चार-पाच महिने तरी सर्वशक्तीनिशी लढावा लागणार आहे. तोपर्यंत संयम महत्त्वाचा ठरणार असून तोच ‘कोरोना’मुक्तीच्या विजयाचे चंदनतिलक ठरणार आहे. विजयश्री कुठे आहे, याचे सुंदर विवेचन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
विजयो नामे अर्जुन विख्यातु ।
विजय स्वरूप श्रीकृष्णनाथु।
श्रियेसी विजय निश्चितु। तेथेची असे॥
भगवान श्रीकृष्ण हे विजयाचे मूर्तिमंत रूप आहे. तो ज्या पक्षात आहे, तेथे विजयश्री खेचून आणणारच. विजयासाठी अर्जुन हे नाव प्रसिद्ध आहे तर श्रीकृष्णनाथ ही विजयाची मूर्तीच आहे. या विजयाच्या ठाई लक्ष्मीसुद्धा वास करते आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांच्या भूमिकांतून विजयश्री हे वैभव आहे आणि दसरा हा या विजयाच्या वैभवाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. मानवतेवर वरचढ ठरलेल्या कोरोना विषाणूने मनुष्याला एक मोठा धडा दिला आहे आणि ज्ञानही दिले आहे. आता हा धडा कसा अंमलात आणायचा आणि ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा, हे आपल्यालाच ठरवायचे आहे. यासाठी आम्ही जागरूक झालो पाहिजे. निसर्गाला हानी पोहोचेल असे कृत्य करणे टाळायला शिकलो पाहिजे. अन्यथा, भविष्यात निसर्ग आणखी कोणते आणि यापेक्षा किती घातक संकट मनुष्यजातीवर ओढवून आणेल, हे सांगता यायचे नाही. या कोरोनामुळे आणखी एक आरोग्याचे महत्त्व सर्वांना पुन्हा एकदा पटले. व्यायामाला वेळ नाही, घरी व्यायाम होत नाही, अशा सबबी सांगणाºया सर्वांनी घरी अगदी नियमित व्यायाम सुरू केला.

लॉकडाऊनच्या दीर्घ आणि कंटाळवाण्या टप्प्यातून अनलॉकमध्ये हळूहळू बंधने थोडी शिथिल झाली आणि कामही सुरू झाले. बºयाच लोकांचे कामाचे स्वरूप कोरोनामुळे आमूलाग्र बदलून गेले. शाळांची कार्यपद्धती काही काळासाठी का होईना आमूलाग्र बदलली, त्याचा अभ्यासक्रमावरही परिणाम होईलच कदाचित. या सगळ्याचा सारांश काय, तर कोरोनाने लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, जीवनपद्धती बदलली, समीकरणे बदलली. वेगवेगळी, अधिक परिणामकारक जीवनकौशल्ये शिकण्याची गरज निर्माण झाली. गरजेचे काय आणि दिखाऊ काय यातील फरक कोरोनाने जाणवून दिला! कोरोनाने माणसाला जमिनीवर आणले आहे. कधी नव्हे ते या अंधारात निश्चितच उद्याचा प्रकाश दडलेला आहे. एक संधी नाहीशी होते तेव्हा अनेक संधी दारावर उभ्या असतात. लॉकडाऊनमधील काळाचा अनेकांनी सकारात्मक उपयोग करून घेतला. स्वत:ला वेगळ्या मार्गावर नेऊन अर्थाजन केले. यापुढेही अशा संधी आपली वाट पाहणार आहेत. अर्थात त्यासाठी आपण कायम सज्ज असायला हवे.

माणसांनीच आजचे आधुनिक जग निर्माण केले आहे, प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर शोधलेले आहे. अनेक बाबतींत निसर्गावर मातही केली आहे. प्रत्येक संकट ही त्याने संधी मानली आहे, त्यामुळे हा विषाणू माणसापुढे टिकणार नाही. थोडा वेळ लागेल आणि तोवर हा विषाणू आपली किंमत वसूल करेल इतकेच. साऱ्यांना या कोरोनाने आपापल्या घरात बंदिस्त केले आहे. या विषाणूने आपल्या सर्वांना दिलेली ही दीर्घ सुट्टी आहे. खरेतर, ही एक संधी आहे. सारे कुटुंब एकत्र नांदते आहे, त्यामुळे मुले आणि आजी-आजोबा आनंदात आहेत. सगळ्यांकडे माणसांशी संवाद टाळणारे स्मार्टफोन असले तरी कुटुंबातील एकमेकांमधील संवाद वाढतो आहे. एकमेकांची नव्यानेच ओळखही होत आहे. वाद असले तरी संवादातून हे वादळ शमत आहे. सारी मानवजात एकजुटीने लढली तरच हे युद्ध आपण जिंकू शकतो.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. लहान मुलांना मोकळ्या जागेत खेळता येत नाहीये. लॉकडाऊनच्या सध्याच्या काळातले स्पेशल मुलांचे, अपंगांचे आणि त्यांच्या पालकांचे आयुष्य खूपच भयंकर आहे. त्यांच्या समस्या सर्वसामान्यांपेक्षा आणखी वेगळ्या आहेत. कोरोना विषाणूमुळे आज मानवी जीवनात जो काही व्यत्यय आला आहे, तितका मोठा व्यत्यय आजवरच्या इतिहासात आलेला नाही. यावरून एकंदरीतच जीवन किती असुरक्षित आणि बेभरवशाचे आहे याची प्रचिती येते. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये अनश्चिततेची ही भीती घर करून आहे. आजवर कधीही करावे लागले नाहीत इतके प्रयत्न करून, या परिस्थितीशी जुळवून घेणे भाग पडत आहे. जागतिक व्यवस्था मोडकळीस आलेली होतीच. त्याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी वारंवार धोक्याचा इशाराही देतच होते. या इशाºयासोबत ते परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आवाहनही करीत होते. मात्र, जुळवून घेण्याची ही प्रक्रिया हळूहळू होणे अपेक्षित होती. ती एवढ्या वेगात होईल असे कोणालाच अपेक्षित नव्हते.

निष्काम कर्मयोगाची भावना भारताच्या नसानसात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा तेव्हा जगाने याचा अनुभव घेतला आहे. स्वत:च्या, आपल्या स्वकीयांच्या आरोग्यासाठी सजगपणे एकजुटीने पुढे जाऊ. आपण प्रयत्न करू की, घरात योगा व कुटुंबीयांसोबत योगा हे दररोज करू. हे केले तर आपण जरूर यशस्वी होऊ. आजच्या परिस्थितीत सीमोल्लंघनाचा नवा अर्थ जाणून घेतला पाहिजे. कोरोनाच्या या लढ्यात हे सीमोल्लंघन एकात्मतेचे, सहकार्याचे असणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या विचाराच्या कक्षा, आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारून पुढे गेलो, आपल्या मर्यादित संकुचित अवस्थेतचे सीमोल्लंघन करून व्यापकत्वाकडे गेलो, आपल्या दृष्टीचे उल्लंघन करून एका विशाल दृष्टीकडे गेलो, आपण आपले विचार कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता समाजापर्यंत पोहोचलो तर ते खºया अर्थाने सीमोल्लंघन ठरेल, इतकेच!
(लेखक मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
 

Web Title: coronavirus: transgression of coronavirus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.