coronavirus: लॉकडाउनमध्ये शाळेकडून होतोय पालकांच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न, निर्देशांना केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:12 AM2020-05-15T04:12:59+5:302020-05-15T04:13:27+5:30

शिक्षण विभागाने सर्व मंडळाच्या शाळांना यंदा शुल्कवाढ न करण्याचे निर्देश देऊन पालकांना दिलासा दिला आहे. शाळा या ना त्या कारणाने पालकांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

coronavirus: School lockdown causes parents' financial woes | coronavirus: लॉकडाउनमध्ये शाळेकडून होतोय पालकांच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न, निर्देशांना केराची टोपली

coronavirus: लॉकडाउनमध्ये शाळेकडून होतोय पालकांच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न, निर्देशांना केराची टोपली

Next

मुंबई : लॉकडाउनमुळे सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व मंडळाच्या शाळांना यंदा शुल्कवाढ न करण्याचे निर्देश देऊन पालकांना दिलासा दिला आहे. शाळा या ना त्या कारणाने पालकांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. वडाळ्याच्या सेंट जोसेफ शाळेकडून पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकाला संपूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करून घेण्याची सक्ती करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एप्रिलमध्येच दिले होते; तरीही सेंट जोसेफसारख्या शाळांकडून या निर्देशांना केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यात आणि देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व उद्योगधंदे आणि कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार शाळांनी पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. तसेच शिक्षण विभागाने जरी केलेल्या निर्णयानुसार पालकांच्या सुविधेसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१साठीचे शुल्क एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करून द्यावा, असे शाळांना सांगण्यात आले आहे. किंवा शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी काही शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसल्यास, त्यासाठीचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीत (ईपीटीए) ठराव करून त्या प्रमाणात शुल्क कमी करावे, असे सुचविले आहे. मात्र सेंट जोसेफ शाळेकडून पाचवीच्या वर्गातील प्रवेशासाठी एकरकमी शुल्क जमा करण्याचे मेसेज, ईमेल पालकांना पाठविण्यात आले आहेत.

या संबंधित तक्रारी आल्यानंतर युवासेनेकडून उपसंचालकांना कारवाई करण्याची मागणी केली. उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी संबंधित शाळेला जाब विचारला असता पालकांना जबरदस्ती करण्यात आली नाही, ज्यांना शक्य असेल त्यांनीच शुल्क भरावे असे नवीन ईमेल पालकांना करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी उपसंचालकांना दिली असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी संगितले.

शिक्षण विभागाचे आदेश असतानाही शाळांकडून पालकांची पिळवणूक करण्याचा हा प्रकार आहे. यासाठी शासन आदेश मान्य न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई आवश्यक असल्याचे मत युवासेना पालिका समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेली ही घटना पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत होण्याची शक्यता असल्याने पालिका शिक्षणाधिकारी यांनाही याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी युवासेनेने केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

लॉकडाउनच्या कालावधीत पालकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्कवसुली केली जाऊ नये, अशा सूचना सर्व व्यवस्थापनांच्या व मंडळांच्या मनपा, खासगी प्राथमिक, अनुदानित, विनाअनुदानित शाळांना परिपत्रक काढून दिल्या आहेत. सर्व शाळांनी शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करावे ही सूचना देण्यात आली आहे.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मनपा, मुंबई

Web Title: coronavirus: School lockdown causes parents' financial woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.