coronavirus: No shortage of blood supply during lockdown - Rajendra Shingane BKP | लॉकडाऊनच्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार नाही, राजेंंद्र शिंगणे यांचे आश्वासन

लॉकडाऊनच्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार नाही, राजेंंद्र शिंगणे यांचे आश्वासन

मुंबई -  राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक सामान, औषधे, सॅनिटायझर, मास्क इ. बाजारात उपलब्ध होतील. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही व मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण व  कर्करुग्णांना रक्ताचा तुटवडा होणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

सध्या जागतिक स्तरावर तसेच देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अधिकारी स्वःताच्या जीवाची पर्वा न करता काळजीपूर्वक या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी कार्यरत आहे. या सर्व बाबींवर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे लक्ष देऊन आहेत.

राज्यातील औषधे उत्पादकांना कच्चा माल पॅकींग मटेरिअल, कामगारांचा तुटवडा, वाहतूक व्यवस्थेत व्यवधान होणार नाही. जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल इ. बाबी विचारात घेऊन वेळोवेळी मंत्रालय स्तरावरून तसेच प्रशासनस्तरावर बैठका आयोजित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे.

औषध प्रसाशन विभागाने दि. 24 मार्च रोजी रक्तपेढींच्या प्रतिनिधींची, तज्ज्ञांची, बीटीओ  व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर राज्यातील प्रत्येक रक्तपेढीने त्यांच्याकडील रक्ताच्या उपलब्धते बाबतची माहिती दिल्यानंतर ती माहिती एकत्रितरित्या संकलित करण्यात येत आहे. माहिती गोळा केली आहे. तसेच रक्तांच्या युनिटची उपलब्धतेची तसेच वितरण केल्याची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत रक्ताचा तुटवडा होणार नाही, यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे शिंगणे यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी येण्यात अडचणी येणार नाही, यासाठी पोलीस व जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक सहकार्य प्राप्त करण्यासाठी कळविण्यात आले आहे. त्यानुसार व्हॉटसअप ग्रुपवर रक्तपेढीकडून अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे. रक्तपेढ्यांकडे पुढील २० दिवस रक्त पुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध आहे.

राज्यात औषधांचा पुरवठा सुरळीत

सध्या सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने या वस्तूंचे निर्माते व पुरवठादार यांच्या कडूनही त्यांच्याकडून उत्पादन व पुरवठा होत असलेल्या सॅनिटायझर व मास्कची तपशीलवार माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक पथक तयार केले आहे व त्यांच्याकडून दर दिवशी साठ्याबाबतची माहिती घेतली जात आहे.

सॅनिटायझर्स, मास्क, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अझिथ्रोमाइसिन, एरिथ्रोमाइसिन, अँटीवायरल ड्रग्स इत्यादीच्या उत्पादनासाठी लागणारे कच्चे माल, पॅकिंग मटेरियल, मनुष्यबळ आदी राज्यातील उत्पादकाकडे उपलब्ध आहे किंवा कसे ? राज्यात उत्पादन केलेल्या व इतर राज्यातून येणाऱ्या या औषधाचे वितरण योग्यरीत्या होत आहे किंवा कसे ? या बाबतची माहिती घेण्यासाठीही प्रशासनाने एक पथक तयार केले असून रोजची माहिती घेण्याबाबत व यात येत असलेल्या अडचणी तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी होत असलेली अडवणूक, मालवाहक वाहनास होणारी अडवणूक, इ. चे निराकरण करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. औषध प्रशासनाची विविध पथके व प्रशासकीय अधिकारी हे युद्धस्तरावर काम करीत आहे.

अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई

प्राप्त तक्रारी व माहितीच्या अनुषंगे औषद प्रशासनाचे अधिकारी पोलिसांसोबत जागोजागी धाड टाकून दर्जाहिन, विनापरवाना, जास्त किंमत आकारणी प्रकरणी कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी करीत आहेत व त्याची माहिती दर दिवशी शासनास प्राप्त होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकूण डिस्टिलरी पैकी 79 डिस्टिलरीना अन्न व औषध प्रशासनाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत सॅनिटायझर उत्पादनासाठी परवाने मंजूर  करण्यात आले आहेत.

Web Title: coronavirus: No shortage of blood supply during lockdown - Rajendra Shingane BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.