CoronaVirus News : Political 'battlefield' from Corona !, BJP's Maharashtra Bachao Andolan | CoronaVirus News : कोरोनावरून राजकीय ‘रणांगण’!, भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

CoronaVirus News : कोरोनावरून राजकीय ‘रणांगण’!, भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करीत आणि कोरोनासंदर्भातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्या$ंनी शुक्रवारी आपापल्या घरी अंगणात उभे राहून घोषणा दिल्या, फलक लावले व सरकारचा निषेध केला.
मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी सहभागी झाले. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन केले.
राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही. एवढेच काय, केंद्राकडून जो निधी येतो आहे, तोही खर्च केला जात नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यातील अडीच लाख कार्यकर्त्यांनी या ‘मेरा आंगन, मेरा रणांगण’ आंदोलनात भाग घेतला, असे प्रदेश भाजपने म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
बाळासाहेब थोरात यांची टीका
भाजपचे नेते अंगणात आंदोलन करणार होते. फडणवीस यांनी मुंबईत तर पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलन केले. ते मतदारसंघात का फिरकले नाहीत, असा सवाल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

सोशल मीडियातही खिल्ली
भाजपच्या आंदोलनावरून समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियातून तुंबळ शब्दयुद्ध रंगले. भाजपच्या नेत्यांना दिवसभर प्रचंड ट्रोल करण्यात आले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरात भगवा झेंडा फडकावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखविले. संकट काळात विरोधकांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे हा फडणवीस यांचा कोल्हापूरच्या महापुरासंदर्भातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. महाविकास आघाडीतर्फे सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रद्रोही बीजेपी या ट्विटर ट्रेंडला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

Web Title: CoronaVirus News : Political 'battlefield' from Corona !, BJP's Maharashtra Bachao Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.