CoronaVirus News: Corona patients at risk of blood clots; Study by experts at KEM Hospital | CoronaVirus News : कोरोना रुग्णांना रक्तात गुठळ्या होण्याचा धोका; केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांचा अभ्यास

CoronaVirus News : कोरोना रुग्णांना रक्तात गुठळ्या होण्याचा धोका; केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांचा अभ्यास

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा विविध पातळ्यांवर अभ्यास केला जात आहे. नुकताच केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी या संदर्भात अभ्यास केला असून त्याद्वारे या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका संभवत असून त्यामुळे गुंतागुंत वाढत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येत असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले. असे आतापर्यंत सुमारे ३० रुग्ण हृदयविकाराने मृत्यू पावले आहेत. विशेष म्हणजे यात काहींना रक्तदाब, मधुमेह हे अन्य आजारही नव्हते. प्रत्येक कोरोना रुग्णामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते.
केईएम रुग्णालयात नेमण्यात आलेल्या मल्टिस्पेशालिटी टास्क फोर्समधील डॉक्टरांची दररोज वेगवेगळ्या कारणांनी गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांच्या तब्येतीविषयी बैठक होते. त्या चर्चेतून रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार केले गेले पाहिजे यावर सल्ला घेतला जातो. शिवाय, कोणते उपचार केले तर रुग्ण दगावण्याची जी संभावना आहे ती कमी होईल. अशा अनेक विषयांवर चर्चा करून निष्कर्ष काढले जातात. सामान्यत: ४० ते ४५ वयोगटातील लोकांना मधुमेह वगैरे असे आजार होत नाहीत. पण, ज्यांना कधीच मधुमेह नव्हता अशा दहा टक्के रुग्णांना कोरोनामुळे मधुमेह झाला होता आणि तो ३०० ते ४०० च्या घरात पोहोचला होता, असे निदर्शनास आले. या रुग्णांच्या रक्तात साखरेची पातळी कमी होत नाही तोपर्यंत केलेल्या उपचारांचा काही फायदा होत नाही. त्यामुळे या रुग्णांचा मधुमेह आधी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला. याचबरोबर जवळपास ८०० रुग्णांना स्थूलता म्हणजेच पोटही सुटलेले होते. असेही रुग्ण होते ज्यांची शुगर वाढली होती, पण मधुमेह नव्हता. अशाच पद्धतीने सुमारे ३० गंभीर रुग्णांबाबतचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्या उपचारांमध्ये काय बदल हवे आहेत, याविषयी सर्वांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच उपचारही केले जातात. या सर्व प्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असणारा जो दर आहे तो १८.९ टक्क्यांहून १०.५ टक्के झाला आहे.

उपचार पद्धतींबद्दल होते तज्ज्ञांशी चर्चा
कोरोना रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. फुप्फुस, हृदय, पाय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे रुग्णांना रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन दिले जाते. सर्व गंभीर रुग्णांबाबत मल्टिस्पेशालिटी डॉक्टरांची बैठक घेतली जाते, ज्यात रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न केला जातो, असे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Corona patients at risk of blood clots; Study by experts at KEM Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.